अमोल खताळ यांची निवडणूक प्रमुखपदी निवड विधानसभेची तयारी; भाजप प्रदेशाध्यक्षाकडून नियुक्तिचे पत्र..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक प्रश्नांसाठी प्रसंगी प्रशासनाला अंगावर घेणारा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या अमोल खताळ यांची भारतीय जनता पक्षाच्या संगमनेर विधानसभा मतदार संघ प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिचे पत्र प्रदान करण्यात आले. सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच नूतन नियुक्त्या केल्या गेल्याने भाजपकडून विधानसभेचीही पायाभरणी सुरु झाल्याचे बोलले जात आहे. आपल्या निवडीनंतर बोलताना खताळ यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघात यावेळी चमत्कार घडणार असल्याचे सांगितले.
गुरुवारी (ता.9) शिर्डीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे मंत्री दादा भुसे, शंभूराज देसाई, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशीष देशमुख, माजी आमदार वैभव पिचड, भानुदास मुरकूटे, धनराज विसपुते, जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, राजाभाऊ गोंदकर, नितीन दिनकर, नितीन कापसे, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे यांच्यासह उत्तर नगरजिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ऐतिहासिक नगरजिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मोठ्या मताधिक्क्याने जिकेल असा विश्वास व्यक्त केला. या निवडणुकांनंतर अल्पावधीतच राज्य विधानसभेचाही कार्यकाळ पूर्ण होत असल्याने लोकसभा निवडणुकीतच त्या निवडणुकांचीही मोर्चे बांधणी सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशाचा सर्वकष विकास होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय असण्याची गरज व्यक्त करताना त्यासाठी दोन्हीकडे एकाच पक्षाचे सरकार असण्याची नितांत गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले. भाजपने प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी स्वतंत्रपणे निवडणूक प्रमुखांची नियुक्ति केली असून संगमनेर विधानसभेसाठी अमोल खताळ यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगताना त्यांनी त्याबाबतचे नियुक्तिपत्रही खताळ यांना प्रदान केले.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना खताळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना त्यात संगमनेरचाही वाटा असे वक्तव्य केले. गेल्या चार दशकांत सुसंस्कृत राजकारणाच्या नावाखाली संगमनेरात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून योग्यवेळी पुराव्यांसह त्यांवरील पडदा उचलला जाईल असे संकेतही त्यांनी दिले. आजवर संगमनेरच्या प्रस्थापित नेत्यांसमोर मातब्बर उमेदवार नसल्याने त्यांचा विजय झाला, मात्र यावेळी परिस्थिती बदलणार असल्याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. अमोल खताळ यांची विधानसभेच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी पुण्यातील आढावा बैठकीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुखच आगामी विधानसभेचे उमेदवार असतील असे स्पष्ट व्यक्तव्य केले होते. त्यामुळे गेल्या अडीच दशकांहून अधिक काळापासून शिवसेनेच्या वाट्याला असलेला संगमनेर मतदार संघ यंदा भाजपकडे जाणार असल्याचे आणि अमोल खताळ भाजपचे संभाव्य उमेदवार असण्याचेही संकेत मिळत आहेत.