साईभक्तांनी सहकार्य केल्यास पंधरा हजारांपर्यंत संख्या नेणार ः बगाटे ऑनलाईन दर्शन पास मिळाल्यानंतरच दर्शनास येण्याचेही केले आवाहन
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर टाळेबंदीनंतर साईभक्तांना दर्शनासाठी खुले केल्यापासून तब्बल 3 लाख 32 हजार साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. सध्या दररोज साधारण बारा हजार साईभक्तांना मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ दिले जाते. मात्र भक्तांनी योग्य प्रकारे सहकार्य केल्यास ही संख्या पंधरा हजारांपर्यंत नेता येईल, असे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितले. नाताळ व नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाईन दर्शन पास मिळाल्यानंतरच दर्शनाला या, असे आवाहनही संस्थानने केले आहे.
टाळेबंदीनंतर शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर साईभक्तांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजेच गेल्या महिनाभरात जवळपास 3 लाख 32 हजार साईभक्तांनी शिर्डीत येऊन दर्शन घेतले आहे. मंदिर खुले केल्यानंतर सुरुवातीला दररोज सहा हजार साईभक्तांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येत होते. त्यानंतर ही संख्या नऊ हजारापर्यंत वाढविण्यात आली. तर आता साईबाबा मंदिरात जाऊन दररोज बारा हजार साईभक्त दर्शन घेत आहेत. ही संख्या पंधरा हजारांपर्यंत वाढवता येऊ शकते, पण त्यासाठी साईभक्तांच्या मदतीची आवश्यकता असल्याचे संस्थानच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
साई मंदिर खुले झाल्यापासून प्रत्येक गुरुवारी, शनिवारी व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर शिर्डीत गर्दी होत आहे. सुट्टीच्या दिवशी तर वीस हजारपेक्षा जास्त लोक दर्शन काऊंटरवर गर्दी करत असल्याचा अनुभव आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे कोणीही ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय शिर्डी दर्शनाला येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात नाताळ सुट्टी आहे. तर 29 व 30 डिसेंबर रोजी दत्त जयंती कार्यक्रम असून 31 डिसेंबरला वर्ष अखेर आहे. हे सर्व पाहता शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कोणीही दर्शन पास ऑनलाईन घेतल्याशिवाय शिर्डीत थेट येऊ नये. कारण दररोज संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार्या दर्शन पास पैकी 70 टक्के पास हे ऑनलाईन असून उर्वरित पास हे ऑफलाईन पद्धतीने शिर्डीत दर्शन पास काऊंटरवर देण्यात येतात. हे पास संपल्यावर दर्शन पास काऊंटर बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पास न मिळाल्यास भक्तांची गैरसोय होऊ शकते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊनच कोणीही ऑनलाईन दर्शन पास घेतल्याशिवाय शिर्डीत येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.