सतरा तासांच्या मिरवणुकीने संगमनेरच्या गणेशोत्सवाची सांगता! मानाच्या मंडळाकडून परंपरेला छेद; संगमनेरातील राजकारण तापले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सव्वाशेहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या संगमनेरच्या गणेशोत्सवाची शनिवारी मोठ्या जल्लोशपूर्ण वातावरणात सांगता झाली. सकाळी आठ वाजता आजी-माजी आमदारांच्या हस्ते मानाच्या सोमेश्‍वर मंडळाच्या गणरायाचे पूजन होवून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदाच्या वर्षी मानाच्या आठ मंडळांसह एकूण बारामंडळांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. गेल्या अनेक वर्षांपासून मिरवणुकीच्या शुभारंभाला मानाच्या गणपतीची आरती करण्याचा मान विद्यमान आमदारांना दिला गेल्याने यावेळी महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते श्रींची आरती होईल असा बहुतेकांचा कयास होता, मात्र मंडळाने आरतीची दोन स्वतंत्र ताटं करुन आजी-माजी आमदारांना एकाचवेळी हा बहुमान देत आपल्याच परंपरेला छेद दिल्याने आमदार खताळ यांच्या सर्मथकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. एकंदरीत विसर्जनाच्या दिनी घडलेल्या या घटनेचे पडसाद दिवसभर उमटल्याचेही दिसून आले, त्यातून संगमनेरचे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.


संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 130 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी 1894 साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर 1895 साली संगमनेरातील सोमेश्‍वर मंदिरातही संगमनेरकरांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन या उत्सवाचा शुभारंभ केला. त्यानंतरच्या कालावधीत कोष्टी, साळी, राजस्थानी, माळी अशा कितीतरी समाजांनी आपापल्या मंदिरांमध्येही या उत्सवाचा विस्तार केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या वर्षापासून म्हणजे 1947 सालापासून संगमनेरात सार्वजनिक गणशोत्सवाची सांगता विसर्जन मिरवणुकांनी करण्याचा प्रघात सुरु झाला. काही वर्षांनी आघाडीवरील क्रमांकावरुन वाद निर्माण होवू लागल्यानंतर तत्कालीन प्रशासनाने स्थापना वर्षानुसार गणेश मंडळांचा क्रम ठरवून शहरातील मानाची गणेश मंडळे निश्‍चित केली.


तेव्हापासून संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत शहरात सर्वप्रथम या उत्सवाची सुरुवात झालेल्या सोमेश्‍वर – रंगारगल्ली मंडळाच्या पाठोपाठ शहरातील अन्य मानाच्या गणपतींचंी मिरवणूक निघू लागली. 2001 साली तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद पवार यांच्या हलगर्जीपणामुळे मानाच्या गणपतीचा मानभंग झाल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यावर्षी मानाच्या मंडळाची मिरवणूक रद्द करुन सोमेश्‍वर मंडळाने जागेवरच आपल्या गणरायाचे विसर्जन केले होते. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांसमोर दिलगिरी व्यक्त करताना तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी सकाळी सात वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्याची सूचना केली. त्यामुळे 2002 सालापासून 55 वर्षांची परंपरा बदलून दुपारी चारऐवजी सकाळी सातवाजता संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होवू लागली.


त्यावर्षी राज्यमंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांना मानाच्या गणरायाची आरती करण्याचा मान देण्यात आला. तेव्हापासून त्यांच्याच हस्ते दरवर्षी हीच परंपरा सुरु राहीली. यंदामात्र संगमनेर विधानसभेत मतपरिवर्तन झाल्याने मानाच्या पहिल्या गणरायाच्या पूजनाचा मान विद्यमान आमदारांना असेल असाच सार्वत्रिक समज होता. प्रत्यक्षात मात्र मंडळाने आपणच निर्माण केलेली परंपरा मोडीत काढताना यावेळी पहिल्यांदाच आरतीच्या एकाऐवजी दोन ताटांची व्यवस्था करीत एकाचवेळी आजी-माजी आमदारांना आरतीचा मान दिल्याने महायुतीच्या गोटात मोठी नाराजी निर्माण झाली. त्यावरुन दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपासह टीका सुरु झाल्याने संगमनेरच्या गणेश विसर्जनाला राजकीय गालबोट लागले असून त्याचे पडसाद उमटायलाही सुरुवात झाली आहे.


यासर्व पार्श्‍वभूमीवर निघालेल्या मानाच्या गणरायाचे सकाळी आठ वाजता पूजन होवून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दुपारी एकच्या सुमारास मानाचा गणपती गवंडीपूर्‍यात आला, त्या पाठोपाठ चौंडेश्‍वरी मंडळ, साळीवाडा मंडळ, राजस्थान मंडळ, चंद्रशेखर चौक मंडळ, नेहरु चौक मंडळ, माळीवाडा मंडळ, अरगडे गल्ली मंडळ, नवघरगल्ली मंडळ व स्वामी विवेकानंद मंडळ अशा एकूण मानाच्या आठ गणपती मंडळांसह भारत चौक मंडळ, क्रांतिवीर मंडळ, देवीगल्ली मंडळ आणि तानाजी मंडळ अशी बारा सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी झाली होती. मित्रप्रेम तेलिखुंट, श्री सत्कार समिती गवंडीपूरा, महायुती-मेनरोड, शिवसेना शाखा क्रमांक 11, चावडी चौक, साईनाथ चौक, फे्रन्ड्स सर्कल, महात्मा फुले चौक व नगरपालिका या ठिकाणी मिरवणुकीतील सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.


सकाळी आठ वाजता सुरु झालेल्या संगमनेरच्या गणेश विसर्जन सोहळ्यात अपवाद वगळता कोणतीही मोठी घटना घडली नाही. बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषदेसह डॉ.जयश्री थोरात यांच्या एकवीरा फौंडेशनच्या स्वयंसेवकांनी प्रवराकाठावर सुरक्षित विसर्जन घडवून आणल्याने सलग सहाव्या वर्षी गणेश विसर्जनाचा ‘संगमनेर पॅटर्न’ यशस्वी ठरला. अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेच्या शंभरावर अधिकारी व कर्मचार्‍यांनी नदीकाठावर हजर राहून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात दहा दिवसांचा हा उत्सव पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली.


यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’चा वापर टाळावा असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले होते, त्याचा मोठा परिणाम दिसून आला. मुख्य विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या अवघ्या दोन मंडळांसह शहरातील अन्य मार्गाने निघालेल्या काही मंडळांनी मात्र पोलिसांचे आवाहन झुगारुन डीजेचा मुक्त वापर केल्याचेही दिसून आले. मात्र त्यांच्याकडून ध्वनीच्या पातळीबाबत गंभीर तक्रार नसल्याने तंबी देत त्यांना सोडून देण्यात आले.

Visits: 308 Today: 2 Total: 1109438

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *