संतापजनक! 14 वर्षीय बालकावर नराधम सावत्र पित्याचेच अनैसर्गिक कृत्य!! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या घृणास्पद प्रकाराने संगमनेरात उसळला संताप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नववर्षाच्या पूर्वसंध्येला किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा चाकूहल्ला झाल्याची चर्चा सुरू असतानाच, आता शहरातून अत्यंत धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. शहरातील गजबजलेल्या भागात राहणाऱ्या एका चौदा वर्षीय बालकावर त्याच्याच सावत्र पित्याने अमानवीय पद्धतीने अनैसर्गिक कृत्य केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी सदर बालकाच्या आईने मुंबईतून दूरध्वनी द्वारा पोलिसांना माहिती कळवतात शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत पीडित मुलासह त्याच्या आठ वर्षीय भावाला त्या नराधमाच्या जोखडातून मुक्त करीत आरोपीला गजाआड केले आहे. या घटनेने संपूर्ण शहरातून संताप व्यक्त होत आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गजबजलेल्या परिसरात एक गृहस्थ आपली पत्नी व दोन मुलांसह राहात होता. मात्र 2014 साली सदर इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याने ती महिला व तिची दोन लहान लेकरं पोरकी झाली. कुटुंबाला आधार म्हणून सदर महिलेने नंतरच्या काळात कुरण येथील अल्ताफ आसिफ शेख या इसमासोबत दुसरा विवाह केला. सदर महिला स्वतःचा व्यवसाय करीत असल्याने कामा निमित्त तिचे बाहेरगावी जाणे असत. त्याप्रमाणे सदर महीला 29 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे कामानिमित्त गेलेली आहे. तिच्यामागे तिच्या दोन्ही लेकरांची जबाबदारी सावत्र पिता असलेल्या नराधम अल्ताफ शेखवर होती.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (ता.11) रात्री अकरा वाजता तो नराधम सावत्र पिता दारुच्या नशेत तर्रर होवून त्या महिलेच्या घरी आला. यावेळी घरात एकटीच असलेली तिची दोन्ही बालके झोपलेली होती. नशेत झिंगलेल्या शेख याने घरात येतात त्या दोघांनाही आर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्यादरम्यानच “मला तुझ्या मम्मीची बोलायचे आहे, फोन लाव” असे म्हणू लागला. त्यावर त्या दोघा भावंडातील चौदा वर्षांच्या मोठ्याने “मी आत्ताच मम्मीशी बोललो आहे, तुम्ही सकाळी बोला” असे म्हटल्याचा राग येवून त्या नराधमाने त्या 14 वर्षीय बालकास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरून जाऊन दोन्ही भावंडे घरातील एका कोपऱ्यात बसून रडू लागली. त्यांच्या रडण्याच्या आवाजाने घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्या खोलीकडे धाव घेत विचारपूस केली असता, अल्ताफ शेख हा इसम त्या मुलांना मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. ते पाहून “तुम्ही लहान लेकरांना का मारता?” अशी विचारणा त्या महिलेने केली असता, “ही माझी मुलं आहेत, मी त्यांच्याशी काहीही करील. तुम्हाला काय करायचं” असे उद्धटपणे म्हणून त्याने त्या महिलेला काढून दिले.

त्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याने दमदाटी व मारहाण करीत त्या 14 वर्षाच्या बालका सोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. भितीपोटी त्यातील आठ वर्षाचा बालक आधीच झोपून गेला होता. त्यानंतरही त्या नराधमाने त्याला त्याच अवस्थेत जवळ झोपवून रात्र तेथेच काढली. आज (ता.1) सकाळी आठच्या सुमारास तो सैतान पुन्हा तसेच कृत्य करू लागला. त्यासाठी त्याने दमदाटी करीत आठ वर्षीय बालकाला घराबाहेर पाठवून दिले. या प्रकारानंतर त्या नराधमाची नजर चुकवून त्या 14 वर्षीय बालकाने तेथून पळ काढला व शेजारी राहणाऱ्या त्या महिलेच्या घरात आश्रय घेतला. पिडित बालकाने घडला प्रकार त्या महिलेला सांगितला व तिच्याच मोबाईलवरुन संफर्क साधीत आपल्या आईलाही सांगितला. हा सगळा धक्कादायक प्रकार ऐकून घाबरलेल्या या माऊलीने त्याला तेथेच थांबण्याची सूचना करीत याबाबत पोलिसांना कळविले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत संबंधित बालक राहत असलेले ठिकाण गाठले. मात्र त्याच्या घराला कुलूप असल्याचे दिसून आले. आसपास चौकशी केली असता मुलगा घाबरलेल्या अवस्थेत शेजारच्या महिलेच्या घरात आढळून आला. त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी धीर दिला असता त्याने अल्ताफ शेख या इसमाने आपल्या आठ वर्षीय भावाला कुरण येथे सोबत नेल्याचे सांगितले. त्या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवीत पोलिसांनी थेट कुरण गाठले. संपूर्ण गावात चौकशी केल्यानंतर पोलिसांना तो आढळून आला. त्याच्या जागेवरच मूसक्या आवळीत पोलिसांनी त्याच्या ताब्यातील त्या आठ वर्षीय बालकाची सुटका केली.

याप्रकरणी पीडित मुलाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी संशयित आरोपी अल्ताफ आसिफ शेख याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 323, 504 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे (पोक्सो) कलम 6 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड केले आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात संताप व्यक्त होत आहे.

