आमदार थोरात सुसंस्कृत व निष्ठावंत नेतृत्व ः डॉ. कोल्हे आमदार बाळासाहेब थोरातांचा दिमाखदार अभीष्टचिंतन सोहळा साजरा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा समृद्ध इतिहास महाराष्ट्राला आहे. इतिहास हा फक्त घोषणा देण्यासाठी नसून प्रेरणा देत असतो. स्वाभिमानी महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही असे सांगताना सातत्याने जनतेमध्ये राहून गोरगरीब व सर्वसामान्यांचा शाश्वत विकास करणारे निष्ठावंत असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार युवा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.

जाणता राजा मैदान येथे संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेच्यावतीने आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार नीलेश लंके, आमदार सत्यजीत तांबे, सत्यशील शेरकर, कांचन थोरात, दुर्गा तांबे, अ‍ॅड. माधव कानवडे, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे, डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, मनीष मालपाणी, उत्कर्ष रुपवते, इंद्रजीत थोरात आदिंसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम जमिनीशी नाळ जोडून ठेवली आहे. सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होताना त्यांनी शाश्वत विकासावर भर दिला आहे. महाराष्ट्राचा सर्वधर्म समभावाचा विचार जोपासला आहे. निष्ठावंत आणि सुसंस्कृत नेतृत्व अशी त्यांची राज्यात ओळख आहे. हे नेतृत्व आपल्या सर्वांना जपायचे आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या समृद्ध परंपरेचा इतिहास आहे. संकटे आले की लढायचे असते पळायचे नसते हा स्वाभिमानाचा इतिहास प्रत्येकाने जोपासला पाहिजे असे ते म्हणाले.

तर आमदार थोरात म्हणाले, स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा विचार आपण जपला आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने कायम आपल्यावर प्रेम केले आहे. जनता ही आई आहे आणि आईचे प्रेम हे मोठे आहे. विकासामध्ये आपण कधीही राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेत विकासाचे काम केले. संगमनेरच्या जनतेमुळे आणि पक्षाच्या नेतृत्वामुळे राज्यात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आणि राज्यातील गोरगरीब जनतेसाठी केला असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तर डॉ. जयश्री थोरात यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *