इतिहासात दुसर्‍यांदा मानाच्या गणरायाचे जागेवरुनच विसर्जन..! कोविडच्या विषाणूंनी जागवल्या दोन दशकांपूर्वीच्या कटू आठवणी

श्याम तिवारी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यंदाच्या गणेशोत्सवावर कोविड विषाणूंचे सावट असल्याने देशभरासह संगमनेरातही भक्तिचा हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला. सार्वजनिक गणेश मंडळांसह मानाच्या गणरायांची स्थापनाही मंदिरांमध्ये अथवा अन्यत्र सुरक्षित ठिकाणी करण्यात आली होती. दहा दिवसांत कोणतेही गर्दीचे कार्यक्रमही झाले नाहीत आणि कोणत्याही मंडळाने देखावेही उभे केले नाहीत. विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी मानाच्या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळाच्या गणरायाचे पूजन झाल्यानंतर पुष्पकमलांनी सजविलेल्या रथातील श्रींना काही अंतर पुढे नेवून त्यांना विसर्जनाच्या दिशेने नेण्यात आले. संगमनेरच्या इतिहासात असा प्रसंग केवळ दुसर्‍यांदा घडला आणि तो देखील इतिहास झाला.


सन 1999 साली संगमनेरच्या श्री विसर्जनाला अगदी सकाळपासूनच सुरुवात झाली. त्यावेळी रात्री दहानंतर लाऊडस्पीकर बंदीचा नियम लागू नसल्याने विसर्जन मिरवणुका रात्रभर चालायच्या. त्यामुळे संगमनेरची मुख्य विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता सुरु व्हायची. तोपर्यंत मुख्य मिरवणुकीचा मार्ग सर्व गणरायांसाठी खुला असत. मात्र दुपारी चारच्या सुमारास एकदा मानाच्या गणरायाचे पूजन झाले आणि तो जागेवरुन हलला की मग मात्र कोणत्याही सार्वजनिक अथवा घरगुती गणरायासाठी या मार्गाचा वापर करण्यास मनाई असत.


दोन दशकांपूर्वी मात्र पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे त्यावेळी 104 वर्षांची परंपरा पूर्ण करणार्‍या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळाच्या मानाच्या गणरायाचा मानभंग झाला. या गणरायाची विधीवत पूजा होवून बाप्पा मार्गस्थ झालेले असतांनाही खंडोबागल्ली मंडळाचा गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरच होता. ही गोष्ट रंगारगल्लीतील कार्यकर्त्यांना समजताच मोठा गदारोळ निर्माण झाला. परिस्थिती होताबाहेर जावू नये यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद पवार यांनी मुख्य मिरवणुकीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी गवंडीपुरा ते नगरपालिका या मार्गावर एकापेक्षा अधिक गणेश मंडळांचे गणपती असल्याने त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला.


त्यामुळे संतप्त झालेल्या रंगारगल्लीतील कार्यकर्त्यांनी मानाच्या गणरायाचे विसर्जनच न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने केवळ स्थानिक प्रशासनच नव्हे तर जिल्हा प्रशासनही हादरले. त्यामुळे रात्री अडीचच्या सुमारास तत्कालीन जिल्हाधिकारी विमलेंद्र शरण यांनी थेट संगमनेर गाठून रंगारगल्लीतील कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते काहीही ऐकण्यास तयार नव्हते, त्यामुळे अखेर जिल्हाधिकार्‍यांनी मानाच्या गणरायाची जाहीर माफी मागत भविष्यात पुन्हा असा प्रकार घडणारच नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, मानाच्या गणरायाची मिरवणूक दुपारी चार ऐवजी सकाळी सात वाजता सुरु होईल, विसर्जन दिनाच्या पूर्व संध्येलाच मुख्य मिरवणुकीच्या मार्गाला जोडणार्‍या सर्व छोट्या-मोठ्या मार्गांना बंद केले जाईल अशा पद्धतीची नवीन नियमावली कायम केली.

तेव्हापासून 1895 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते स्थापना झालेल्या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळाची विसर्जन मिरवणुक दुपारी चार ऐवजी सकाळी सात वाजल्यापासून सुरु होऊ लागली. 1999 सारखा प्रसंग पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री मुख्य मिरवणुकीच्या मार्गाला जोडणारे सर्व रस्ते बॅरिकेटस लावून बंद करण्यात येवू लागले. ही परंपरा तेव्हापासून म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून आजही कायम आहे. त्यानंतर पुन्हा असा प्रसंग कधीही घडला नाही.


यंदा मात्र कोणताही मानभंग न होता मानाच्या गणरायाला जागेवरच पूजन करुन निरोप द्यावा लागला. त्याला कारण होते कोविड महामारीचे. या महामारीने यंदा गणेशोत्सवावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र संगमनेरकरांच्या श्रद्धेपुढे कोविडलाही शरणांगती पत्करावी लागली. संगमनेरातील घराघरात गणरायांचे आगमन झाले, मानाच्या अकरा गणरायांसह सार्वजनिक गणेश मंडळांचे 46, शहरालगतच्या चौदा ठिकाणी एक गांव, एक गणपती विराजमान झाले. कमतरता भासली ती शाही मिरवणुका, देखाव्यांचा डामडौल आणि तरुणाईच्या जल्लोशात. मात्र गणेशभक्तांच्या भक्तीत आणि बाप्पांना निरोप देण्याच्या उत्साहात कोठेही कमतरता आढळून आली नाही. मात्र कोविडच्या विषाणूंनी मानाच्या गणरायाच्या बाबतीत घडलेल्या वीस वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ कटू प्रसंगाच्या आठवणी मंगळवारी पुन्हा एकदा ताज्या केल्या आणि संगमनेरकर त्या आठवणींनी पुन्हा एकदा शहारले.

Visits: 125 Today: 1 Total: 1421484

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *