मुळा धरण भिंतीवर अडकलेल्या तरुणाची सुखरूप सुटका
मुळा धरण भिंतीवर अडकलेल्या तरुणाची सुखरूप सुटका
नायक वृत्तसेवा, राहुरी
मुळा धरणाचे अकरा दरवाजे मंगळवारी (ता.1) सकाळी नऊ वाजता उघडले. प्रचंड वेगाने जलप्रपात धरणाच्या दरवाजा खालील स्थिर पात्रात कोसळून नदीपात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागला. स्थिर पात्राच्या मधोमध असलेल्या भिंतीवर एक तरुण अडकला. पाण्याने वेढलेल्या तरुणाला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु जलसंपदाच्या अधिकार्यांनी परिस्थिती लक्षात घेत तात्काळ नुकतेच उघडलेले सर्व दरवाजे पुन्हा बंद केले. दरवाजांच्या खाली स्थिर पात्राच्या भिंतीवर अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 15 मिनिटांनी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. धनराज बर्डे (वय 20, रा.नांदगाव) असे अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
धनराज बर्डे हा धरणाचे दरवाजे उघडण्याचे दृश्य पाहण्यासाठी थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. पहिले तीन दरवाजे उघडले त्यावेळी धनराज भांबावला. तसाच बसून राहिला. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सर्व 11 दरवाजे उघडले. झपाट्याने स्थिर पात्रात पडलेले पाणी मुळा नदी पात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागले. धनराजच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिला. यामध्ये धनराज पुरता अडकला. पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पत्रकारांनी धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, घटनेची माहिती दिली. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तातडीने दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पाणी कमी झाले आणि धनराजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंधरा-वीस मिनिटे धनराज पाण्याने वेढला होता. त्याच्या जवळून दोन हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने प्रचंड आवाज करीत जलप्रपात नदीपात्रात वेगाने जात होता. नशीब बलवत्तर म्हणून धनराजचे प्राण वाचले. घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने काही उत्साही पर्यटक दरवाजा खाली असलेल्या स्थिर पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. तर, काही पर्यटक स्थिर पात्राच्या भिंतीवरून, वेगाने वाहणार्या पाण्यातून चालत होते.