संगमनेरातील अनेकांनी घरातच केले श्रींचे विसर्जन!
संगमनेरातील अनेकांनी घरातच केले श्रींचे विसर्जन!
ओझा परिवाराने शेणामातीच्या तर गुंजाळ परिवाराने शाडूच्या मूर्तीतून दिला पर्यावरणपुरक संदेश
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या सावटाखाली गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी सांगता झाली. वार्षिक आणि दहा दिवसीय प्रतिष्ठापना होणार्या या सार्वत्रिक उत्सवात यंदा दहा दिवस उत्सव साजरा करणार्या अनेकांनी पर्यावरणपुरक मूर्तींची स्थापना व विसर्जन केले. सामाजिक कार्यकर्ते सुदाम ओझा व पत्रकार नितीन ओझा यांनी संगमनेरात प्रथमच शेणामातीतून साकारलेल्या श्रींची तर पालिकेचे कार्यालयीन प्रमुख राजेश गुंजाळ यांनी शाडूमातीच्या श्रींची स्थापना करुन मंगळवारी घरातच तयार केलेल्या आकर्षक कुंडात त्यांचे विसर्जन केले.
![]()
गेल्या काही वर्षांत सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल झाले आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात मातीपासून श्रींची पार्थिव मूर्ती घडवून ती भाद्रपद शुक्ल चतुर्थाला स्थापन केली जात, आणि अनंत चतुर्दशीच्या दिनी भावपूर्ण वातावरणात नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जित केली जात असे. नंतरच्या काळात शाडूमातीपासून घडविलेल्या मूर्ती तयार होवू लागल्या. मात्र महाराष्ट्राच्या नागरी उत्साहात कोठेही कमतरता आली नाही.

गेल्या दोन-तीन दशकांत यातही बदल घडत गेले आणि पीओपीपासून तयार झालेल्या मूर्ती बाजारात येवू लागल्या. मातीच्या अथवा शाडूमातीच्या मूर्तींपेक्षा या मूर्ती अधिक सुबक आणि उठावदार दिसत असल्याने अल्पावधीतच मातीच्या मूर्तींच्या जागी पीओपीच्याच मूर्ती वापरात येवू लागल्या आणि तेथूनच पर्यावरणाला बाधा निर्माण होवू लागली. दहा दिवसांच्या उत्सवानंतर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये या मूर्तींचे विसर्जन होवू लागल्याने पर्यावरणासह जलचरांचे जीवनही धोक्यात आले. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून पीओपी मूर्तींना विरोध सुरु झाला. मात्र हा उत्सव श्रद्ध आणि भावनांचा असल्याने या विरोधाला गेलीे अनेक वर्ष कोणी फारसा भाव दिला नाही.

मात्र गेल्या काही वर्षांपासून समाजातूनच बदलाचे वारे वाहू लागले असून अनेजण दहा दिवसांच्या उत्सवासाठी शाडूमातीच्या मूर्तींना पसंदी देवू लागले आहेत. संगमनेरातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम ओझा व त्यांचे बंधू, पत्रकार नितीन ओझा यांनी यंदा अभिनव उत्सव साजरा करताना शेणामातीपासून बनविलेल्या श्रींची प्रतिष्ठापना करुन नवा आदर्श घालून दिला. तर पालिकेचे कार्यालयीन प्रमुख राजेश गुंजाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घरातील बाप्पांची मूर्ती शाडूचीच घेतात व त्याचे विसर्जनही घरातच आकर्षक पद्धतीचा कृत्रिम कुंड करुन त्यात करतात. ही दोन उदाहरणे संगमनेरातील गणेशभक्तांसाठी अत्यंत आदर्शवत आणि अनुकरणीय असून प्रत्येकाने पर्यावरण आणि जलचरांचा विचार करुन शाडूच्या अथवा मातीच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्यास दरवर्षी होणारी पर्यावरणाची हानी टळेल हे मात्र निश्चित.

