घुलेवाडी ग्रामस्थांकडून ‘थुंकणे विरोधी जनजागृती सप्ताहा’चे आयोजन 1 ते 7 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करणार नागरिकांचे प्रबोधन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड महामारीमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधरण महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायत, ग्राम सुरक्षा दल आणि ग्रामस्थांच्यावतीने थुंकणे विरोधी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ते 7 जून, 2021 असा सप्ताहाचा कालावधी असणार आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांनी सर्व शासकीय नियम पाळून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता.1) थुंकणे विरोधी जनजागृतीची सार्वजनिक प्रतिज्ञा घेऊन सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
![]()
कोविड विषाणूने संपूर्ण जगभर अक्षरशः थैमान घातले आहे. यामध्ये स्वच्छतेला मोठे महत्त्व असल्याने शासन स्तरावरुन देखील प्रबोधन करण्यात येत आहे. तरी देखील अनेक बेजबाबदार नागरिक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. यामध्ये थुंकणे ही फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याने जाताना अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक बेदरकारपणे थुंकतात. त्याचा मानसिक त्रास त्यांच्या मागे असणार्या प्रवाशांना होतो. अनेकजण तंबाखू, गुटखा यांचे सेवन करून दुकाने, टपर्या, बाजार, दूध डेअरी, कार्यालय इत्यादी सार्वजनिक ठिकाणी विनाकारण थुंकून परिसर अस्वच्छ करतात. या थुंकण्यामुळे पाण्याचे साठे खराब होत आहे. तसेच पावसाळ्यात अनेक आजारांना निमंत्रण भेटू शकते. खोकणे, शिंकणे याप्रमाणे थुंकणे हेही कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलेले आहे. त्यामुळे थुंकणे ही समस्या मोडीत काढण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामसुरक्षा दल आणि ग्रामस्थांनी ही नामी शक्कल शोधून काढली आहे.

मंगळवारी या सप्ताहाची सुरुवात थुंकणे विरोधी जनजागृती प्रतिज्ञा घेऊन झाली. गावातील अनेक तरुण व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे सदस्य सीताराम राऊत आणि सरपंच सोपान राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शपथ घेतली. शपथेचे वाचन प्रकाश पारखे यांनी केले. मी स्वतः थुंकणार नाही आणि इतरांनाही विनाकारण थुंकू देणार नाही (वाद न घालता). विनाकारण थुंकल्याने अनेक आजारांना सुरुवात होते म्हणून गावातील अनेक घटकांचे प्रबोधन करण्यात येईल. रस्त्यावरील प्रवाशांचे, वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येईल. मित्र, नातेवाईक यांनाही थुंकू नये यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. आपला गाव स्वच्छ झाला की आपोआप तालुका, जिल्हा, राज्य आणि देश थुंकणे मुक्त होईल. त्यासाठी सर्व मिळून प्रामाणिक प्रयत्न करूया असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

शपथेपूर्वी सरपंच राऊत, भास्कर पानसरे, राजश्री वाकचौरे, लखन राऊत, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय राऊत, मच्छिंद्र राऊत, गोरक्षनाथ राऊत आणि इतर ग्रामस्थांचे वाढदिवस स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करून साजरे करण्यात आले. त्यानंतर शासनाचे सर्व नियम पाळून गावातील मुख्य चौकात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) प्रतिज्ञा घेतली. तसेच या सप्ताहाचा भाग म्हणून बुधवारी सकाळी 10 वाजता घुलेवाडी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत युवक कार्यकर्त्यांनी आपल्या हातात थुंकणे विरोधी जनजागृतीसाठी तयार केलेले बॅनर घेऊन प्रवाशांचे मुकपणे प्रबोधन केले. वाहतुकीला कोणताही अडथळा न करता लोकांना दिसेल, वाचता येईल अशा पद्धतीने बॅनर युवकांनी हातात धरले होते. घुलेवाडीकर ग्रामस्थांनी उचललेल्या या धाडसी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याकामी डॉ.शशीकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे.

या सप्ताहासाठी ग्रामपंचायत सदस्य शंकर ढमाले, दिलीप पराड, मच्छिंद्र पानसरे, चंद्रकांत क्षीरसागर, उपसरपंच अनिल राऊत, पुंडलिक राऊत, तुषार कांबळे, संजय राऊत, विकास पानसरे, राहुल वर्पे, रवी गिरी, संजय पानसरे, वैभव गायकवाड, लखन तामचीकर, राजू खरात, ग्राम सुरक्षा दलाचे आणि युवाशक्ती संघटनेचे सर्व कार्यकर्ते, गुरुवर्य जी.व्ही.रुपवते मेमोरियल ट्रस्ट आणि घुलेवाडी फाट्यावरील सर्व रिक्षा चालक प्रयत्नशील आहेत.
