‘डीजे व शार्पी लाईट्स मुक्त’ गणेशोत्सव साजरा करणार : मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गणेशोत्सव हा मांगल्याचा आणि आनंदाचा उत्सव आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या उत्सवातून मनमुराद आनंद मिळाला पाहिजे. या भूमिकेतून यंदाच्या वर्षापासून शंभर टक्के ‘ डीजे आणि शार्पी लाईट्स पासून मुक्त आणि आनंदाने युक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णयमंडळाने घेतला आहे. शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या निर्णयाचे अनुकरण करण्याचा निर्णय सर्व मंडळांनी घ्यावा म्हणजे संगमनेरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वत्र एक चांगला संदेश देण्यात आपण यशस्वी होऊ असे आवाहन राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष आणि संगमनेर फेस्टिव्हलचे प्रणेते उद्योजक मनिष मालपाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
उत्सवाची लोकप्रियता आणि उपयुक्तता अधिकाधिक वृद्धींगत व्हावी यासाठी या वर्षापासून आम्ही तज्ज्ञांशी या विषयावर सविस्तर चर्चा करून स्वतः पुढाकार घेऊन डीजे व शार्पी लाईट्स पासून मुक्ती हीच, गणपती बाप्पाची भक्ती’ अशी मोहीम स्वतः पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. डीजेच्या मोठमोठ्या भिंती उभारून कानठळ्या बसविणारा आणि घरे दुकाने यांना हादरे बसविणारा कर्णकर्कश घातक आवाज मानवी आरोग्यासाठी खूप धोक्याचा ठरत आहे. केवळ कानांवर नाही तर रक्तदाब, हृदय क्रिया, मानसिक संतुलन यावर विपरीत परिणाम डीजे मुळे होत आहेत. शार्पी लाईट्स मधून निघणारे प्रखर व वेगवान फिरणारे प्रकाश किरण डोळ्यांसाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेकांना या शार्पी लाईट्स मुळे अंधत्व आल्याची उदाहरणे आहेत.या सर्व घातक दुष्परिणामांना थांबविण्याच्या या प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत आणि अनुकरण होईल असा विश्वासही मनिष मालपाणी यांनी व्यक्त केला.

मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा, खजिनदार प्रतीक पोफळे, सहसचिव कृष्णा आसावा, सहखजिनदार वेणूगोपाल कलंत्री यांच्यासह कार्यकारणी सदस्य गिरीश मालपाणी, मनीष मणियार, नितीन लाहोटी, ओंकार बिहाणी, रोहित मणियार, सचिन पवार, राजेश आर. मालपाणी, कल्याण कासट, सम्राट भंडारी, सुदर्शन नावंदर, व्यंकटेश लाहोटी, उमेश कासट, ओंकार इंदाणी, नंदन कासट, पवन करवा, चेतन नावंदर, अक्षय कलंत्री, अमित चांडक, निलेश एन.जाजू ,आनंद लाहोटी, कौस्तुभ झंवर, शुभम असावा, महेश पडतानी, प्रथम खटोड, प्रणित मणियार आदी डीजे व शार्पी लाईट्स मुक्त व पारंपारिक मर्दानी खेळ युक्त गणेशोत्सवासाठी प्रयत्नशील आहेत.

Visits: 108 Today: 1 Total: 1114198
