राजूरकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू!

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्याची धरणांचा तालुका म्हणून ओळख आहे. परंतु, धरणाजवळ असणार्‍या राजूर गावचा पाणी प्रश्न कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ऐरणीवर आला आहे. मार्च महिन्याच राजूरकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. वीजबिलाअभावी पाणी योजनेची वीज जोडणी महावितरण तोडण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात पाणी संकट तीव्र झाले आहे.

राजूर ग्रामपंचायतने गेले वर्षभर वीजबिल न भरलयाने आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने पाणी पुरवठ्याची वीज जोडणी तोडली आहे. त्यामुळे राजूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न आहे. याकामी कोणीही पुढाकार घेऊन प्रश्न सोडविण्यास धजावत नाहीये. त्यात अनधिकृत नळ जोडणीचा मुद्दा गंभीर आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचे संकट असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. त्यामुळे वसुली होत नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. तत्पूर्वी एक-दोन बिले भरणे ग्रामपंचायला शक्य असतानाही भरली नाहीत. त्याचा परिणाम आज दिसू लागला आहे. महावितरण कंपनीने राजूर ग्रामपंचायतला 9 लाख रुपये भरायला सांगितले आहे. त्यातील 4 लाख भरले असून 5 लाख अजून भरणे बाकी असल्याने थकबाकीदारांनी लवकरात लवकर थकबाकी भरण्याचे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 115083

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *