अमृतसागरला राज्यात पहिल्या क्रमांकावर न्या : पिचड राजूर येथे नवनिर्वाचित संचालकांचा माजी मंत्री पिचडांच्या हस्ते सत्कार
नायक वृत्तसेवा, अकोले
देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी व राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचेकडे आल्याने देशातील व राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. जय-पराजय हे लोकशाही राजकारणात येतात जातात. मात्र प्रामाणिक कार्यकर्ते सोबत आले की विजयाचे समाधान मिळतेच असे सांगतानाच अमृतसागर दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने संघ आता राज्यात क्रमांक एकवर न्या, अशी अपेक्षा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली.
अकोले तालुक्यातील राजूर येथे अमृतसागर दूध संघाच्या नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अमृतसागर दूध संघाच्या निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाचे 15 पैकी 13 उमेदवार निवडून आल्याबद्दल राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड व माजी सरपंच हेमलता पिचड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालकांसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकरी विकास मंडळाचा विजय हा तालुक्यातील दूध उत्पादक सभासद व तालुक्याच्या आम जनतेचा असून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. तसेच यापुढे सभासद दूध उत्पादकांच्या दुधाला योग्य भाव मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त करुन या निवडणुकीत ज्ञात-अज्ञात मतदारांनी केलेले सहकार्य नेहमी स्मरणात राहील तर संघ राज्यात क्रमांक एकवर आणण्याचा प्रयत्न असेल असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक अप्पासाहेब आवारी यांनी केले. सूत्रसंचालन दौलत देशमुख यांनी केले तर आभार उपसरपंच संतोष बनसोडे यांनी मानले.