मतिमंद मुलीवर अत्याचार करुन गर्भवती करणार्यास दहा वर्षांचा कारावास! संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाचा निकाल; गर्भाच्या ‘डीएनए’ चाचणीतून आरोपीची ओळख..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात तपासी अधिकार्यांनी केलेल्या तपासावरच घडलेल्या गुन्ह्याची गुणवत्ता अवलंबून राहते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. चार वर्षांपूर्वी अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाड्यात घडलेल्या मतिमंद मुलीवरील अत्याचार प्रकरणात पीडितेने दोघांनी अत्याचार केल्याचे आईला सांगितले. मात्र त्यातून पोटात वाढलेला गर्भ कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करताना दफन केलेला गर्भ बाहेर काढून त्याचे नमूने घेतले आणि न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या अहवालाने 59 वर्षांच्या सोपान अप्पाजी गवांदे या थेरड्याला दहा वर्षांच्या सक्तमजुरीसाठी येरवडा कारागृहात धाडले. संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एस.घुमरे यांनी आज हा महत्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील अन्य एका आरोपीला मात्र पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले.
याबाबतची हकिकत अशी की, 16 ऑगस्ट 2020 रोजी अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील एका 65 वर्षीय महिलेने आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार फिर्यादी महिलेची मुलगी मतिमंद असल्याने घरात कोणीही नसताना पीडितेच्या घरी नेहमी येणार्या अजित उर्फ पप्पू रंगनाथ फलके (वय 33, रा.मुळवेहरा) व सोपान अप्पाजी गवांदे (वय 59, रा.चैतन्यपूर) या दोघांनी वेळोवेळी तिचा गैरफायदा घेवून अत्याचार केल्याने ती गर्भवती राहील्याची तक्रार नोंदविली.
अकोले पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी तत्काळ या प्रकरणाची सूत्र हातात घेत आळेफाटा येथे जावून अधिक तपास केला असता पीडित मतिमंत मुलीच्या पोटातील गर्भ प्रसूतीपूर्वीच मृतावस्थेत असल्याचे तपासणीतून समोर आल्याने 13 ऑगस्टरोजी शस्त्रक्रिया करुन तो काढण्यात आल्याचे आळेफाटा येथील डॉ.राजेंद्र धांडे यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर अकोले पोलिसांनी तालुका दंडाधिकार्यांच्या उपस्थितीत दफन केलेला गर्भ बाहेर काढून त्याच्या हाडाचे नमूने घेवून ते नाशिकच्या न्यायवैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले.
या दरम्यान दोन्ही संशयीत आरोपी पसार झाले. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन करुन त्यांचा माग काढीत 18 ऑगस्ट रोजी अजित फलकेला तर जवळपास महिन्याभरानंतर 6 ऑक्टोबररोजी सोपान गवांदे याला अटक केली. या दरम्यान न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या अहवालातून मृत गर्भ सोपान गवांदेचा असल्याचेही समोर आले. मात्र पीडित मुलीने दोघांनीही आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती तिच्या आईला दिल्याने पोलिसांनी दोघांवरही भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमान्वये संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात नोव्हेंबर 2020 मध्ये दोषारोप दाखल केले.
जिल्हा न्यायाधीश डी.एस.घुमरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी प्रबळ युक्तिवाद करताना दहा साक्षीदार सादर केले. त्यातील खूद्द पीडितेने न्यायालयात दिलेली साक्ष, आळेफाटा येथील डॉ.राजेंद्र धांडे व डॉ.बी.टी.सोनवणे यांच्यासह न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे डॉ.एम.ए.राजेशिर्के यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सोपान अप्पाजी गवांदे याला 10 वर्ष सश्रम कारावास आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर संशयीत आरोपी अजित उर्फ पप्पू रंगनाथ फलके याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार प्रवीण डावरे, महिला पोलीस स्वाती नाईकवाडी, नयना पंडित, दीपाली रहाणे, प्रतिभा थोरात व अकोले पोलिसांनी सहाय्य केले.