आश्वी बुद्रुकमध्ये सत्ताधारी-विरोधकांत विकासकामांवरुन जुंपली मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्यास जनसेवा मंडळाकडून आंदोलनाचा इशारा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे श्रीराम मंदिर जागेतील अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रितपणे काढल्यानंतर त्या जागेवर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम लोकवर्गणीतून सुरू आहे. या जिर्णोद्धार कामासाठी संगमनेर तालुक्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कोणतीही भरीव आर्थिक मदत केली नाही. तसेच मंदिराच्या परिसरात असलेल्या जागेत कुठलेही अतिक्रमण झाल्यास त्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीराम मंदिराच्या जागेत पूर्वी काही लोकांनी अतिक्रमण केले होते. त्या लोकांना विरोधी मंडळांनी साथ दिली. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी एकत्रितपणे अतिक्रमण काढून त्याठिकाणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सर्वपक्षीय ग्रामस्थांनी हाती घेतले. या कामासाठी दोन वर्षांपूर्वी रामकथेच्या माध्यमातून तीन ते साडेतीन लाख रूपये लोकवर्गणी गोळा झाली, तिचा वापर या कामासाठी करण्यात आला. ग्रामपंचायत सत्ताधार्यानीं मंदिराच्या कामासाठी बक्षीस सोडत योजना काढली त्यातून सुमारे 50 लाख रूपये जमा झाले असून अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीने बक्षीस सोडत योजना जाहीर केलेली नाही. असे असताना ही गोळा झालेली रक्कम कुठे गेली? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
स्मशानभूमीत असलेले 25 ते 30 नारळाची झाडे ग्रामसभेची परवानगी न घेता काढून टाकण्यात आली आहे. तसेच या परिसरात गावातील जमा होणारा कचरा टाकला जात असल्याने या दुर्गंधीचा त्रास अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना होत आहे. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीचा परिसर दुर्गंधीमुक्त करावा, त्याचबरोबर गावातील आठवडे बाजार भरत असलेल्या जागेत ग्रामपंचायतीने लहान मुलांची खेळणी व खुल्या व्यायाम शाळेचे साहित्य उभारल्याने बाजारसाठी येणार्या व्यावसायिकांना त्याची मोठी अडचण होत असल्याने ही खुली व्यायामशाळा चांगल्या व प्रशस्त जागेत हलवावी. या मागण्यांबरोबरच गावात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहे. त्याला ग्रामपंचायतीच्या काही सत्ताधारी लोकांचे पाठबळ आहे. हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव करण्याची मागणी जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रसिध्दी पत्रकावर जनसेवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते माधव गायकवाड, विनायक बालोटे, अशोक म्हसे, भाऊसाहेब जर्हाड, हरिभाऊ ताजणे, ज्ञानेश्वर वाकचौरे, मिलिंद बोरा, जानकीराम गायकवाड, अजय ब्राम्हणे, साहेबराव बाचकर, रणजीत गायकवाड, अशोक जर्हाड आदिंच्या सह्या आहेत.
प्रभू श्रीरामाच्या मंदिर जिर्णोध्दारासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी 14 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला. मंदिर पूर्णत्वास जात असल्याने विरोधक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बेछूट आरोप करत आहेत. स्मशानभूमी विकासासाठी 20 लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून 40 वर्षे यांना परिसरातील कचरा व दुर्गंधी दिसली नाही का? गावात अवैध धंदे कुणाचे आहेत याचे उत्तर विरोधकांनी द्यावे व आम्हांला हिशोब विचारण्याआधी 2 कोटी रुपयांच्या पाईपलाईनचा हिशोब विरोधकांनी द्यावा.
– विजय हिंगे