गोधेगावच्या सरपंचपदी ‘पुन्हा’ गोलांडे; अविश्वास ठराव बारगळला
गोधेगावच्या सरपंचपदी ‘पुन्हा’ गोलांडे; अविश्वास ठराव बारगळला
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील गोधेगावचे युवा सरपंच राजेंद्र गोलांडे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव बारगळला आहे. या ठरावाच्या वेळी नियमानुसार दहापैकी आठ मते आवश्यक असते. मात्र ठरावाच्या मासिक सभेत सहा सदस्य हजर असल्याने हा ठराव बारगळला. यामुळे पुन्हा राजेंद्र गोलांडे हेच सरपंच रहाणार असल्याने युवकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. विरोधक प्रबळ असेल तर काम करण्याला देखील उत्साह व जोष येत असतो. मी अपक्ष सरपंच म्हणून जनतेतून निवडून आलो असल्याने गावाच्या उत्कर्षासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याची ग्वाही सरपंच गोलांडे यांनी यावेळी बोलताना दिली.

नेवासा तालुक्यातील गोधेगाव हे श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांची जन्मभूमी असल्याने या गावावर वारकरी सांप्रदायाचा मोठा पगडा आहे. मागील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दहा सदस्य निवडून आले होते. तर सरपंचपदाच्या निवडणुकीत युवा कार्यकर्ते राजेंद्र गोलांडे व त्यांचे प्रतिस्पर्धी यांना समसमान मते पडली होती. त्यामुळे चिठ्ठी काढून राजेंद्र गोलांडे हे सरपंच झाले होते. सदस्यांना विश्वासात घेत नाही असा आरोप करत काही सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठरावाच्या वेळी बोलवलेल्या मासिक बैठकीप्रसंगी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.नेमाणे यांनी काम पाहिले. अविश्वास ठरावाच्या वेळी सरपंच राजेंद्र गोलांडे यांच्या समवेत ग्रामपंचायतचे सहाच सदस्य हजर होते. अविश्वास ठरावासाठी आठ सदस्यांची गरज असल्याने हा ठराव बारगळला. त्यामुळे ठराव दाखल करणार्यांचे स्वप्न भंगल्याने त्यांचाही हिरमोड झाला.

