नेवाशामध्ये सर्व सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल सुरू करा!

नेवाशामध्ये सर्व सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल सुरू करा!
भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांची तहसीलदारांकडे मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा येथे सर्व सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल सुरू करा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदनाद्वारे केली आहे. आर्थिक बाजू भक्कम असलेले लोक बाहेर उपचार घेतील. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे ज्यांची उपासमार सुरू आहे; अशा सर्वसामान्य लोकांनी जायचे कुठे? असा सवाल करत हॉस्पिटल होण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचा निर्धारही दिनकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.


नेवासा तालुक्यात कोविड-19 रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता तालुक्यात अद्यावत कोविडचे रुग्णालय नसल्या कारणाने रुग्णांना उपचारासाठी अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, मुंबई अशा मोठ्या ठिकाणी उपचारांसाठी जावे लागत आहे. गोरगरीब, मोलमजूर, शेतकरी, हमाल, सर्वसामान्य जनतेला कोविडच्या उपचारासाठी पैसे नसल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. नगरपंचायत कोविड-19 प्रतिबंधासाठी शंभर बेडचे सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल उभारणे, शहरात जंतूनाशक फवारणे, रुग्णांना मोफत तपासणी व औषधोपचार करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे कोविड तपासणी एक्स-रे मशीन, ऑक्सिजन पुरवण्याची सुविधा व औषधांची उपाययोजना करावी. ही अत्यंत महत्वाची बाब असून या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नेवासा येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी दिनकर यांनी केली आहे. याबाबत दखल न घेतल्यास नगरपंचायत व तहसील दालनात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.


सदर निवेदन देतेवेळी माजी सरपंच सतीश गायके, नगरसेवक सचिन नागपुरे, भाजप युवा मोर्चाचे निरंजन डहाळे, अमोल कोलते, प्रवीण खरात, राजेंद्र वाबळे उपस्थित होते.

Visits: 100 Today: 1 Total: 1116140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *