चंदनापुरी ते शिरापूर रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांकडून कामाची चौकशी करुन कारवाईची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या चंदनापुरी ते शिरापूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या दोनच महिन्यांत रस्ता उखडला आहे. तब्बल पावणे दोन कोटी रुपये खर्च करुनही या रस्त्याने ये-जा करणा-यांना त्रास सहन करावा लागत असल्याने चंदनापुरी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराची चौकशी करुन कडक कारवाई करावी. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

चंदनापुरी येथे शिक्षण घेण्यासाठी शिरापूर व हिवरगाव पावसा येथील विद्यार्थी या रस्त्यावरुन ये-जा करतात. तसेच शेतकर्यांची देखील नेहमीच वर्दळ असते. त्यादृष्टीने रस्त्याचे काम व्हावे म्हणून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे नागरिकांनी पाठपुरवा केला. त्यांनी देखील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पावणे तीन किलोमीटर रस्त्यासाठी पावणे दोन कोटी रुपये मंजूर केले. त्यानंतर दोन वर्षापूर्वी माजी मंत्री आमदार थोरात यांच्याच हस्ते या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले होते. त्याचवेळी त्यांनी रस्त्याचे दर्जेदार काम करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या होत्या. परंतु, रस्त्याचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले. मातीमीश्रितत मुरूम टाकून काम पूर्ण केल्याचा केवळ दिखावा केला. याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा गटारी देखील काढलेल्या नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने कठडे देखील बांधलेले नाही. अनेक ठिकाणी अडथळे निर्माण करणारे विद्युत खांब आणि झाडे देखील काढलेली नाही. विशेष म्हणजे अवघ्या दोनच महिन्यांत रस्ता उखडला असून, डांबर निघून गेले आहे.

यामुळे चंदनापुरीसह परिसरातील नागरिक चांगलेच संतप्त झाले असून, ठेकेदार व अभियंता यांनी केलेल्या कामाची चौकशी करुन कडक कारवाई करावी. अन्यथा ग्रामस्थ आमरण उपोषण करतील, असा इशारा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजय रहाणे, नानासाहेब रामभाऊ रहाणे, डॉ. अशोक कढणे, अमित कढणे, यादव कढणे, विलास रहाणे, नाना देवराम रहाणे, अनिल रहाणे, उत्तम जाधव, शशी जाधव व स्थानिक महिलांनी दिला आहे.

सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. साईडपट्ट्या देखील केलेल्या नाहीत, रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारीही काढलेल्या नाहीत, रस्त्यामध्ये आलेले विजेचे पोल व झाडे काढलेले नाहीत. काम करताना कोणत्याच प्रकारची गुणवत्ता राखलेली नाही. संबंधित ठेकेदार व अभियंता यांना वेळोवेळी कल्पना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे संबंधित कामाची चौकशी होऊन ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा तसे न झाल्यास आम्ही चंदनापुरी, हिवरगाव पावसा व शिरापूर येथील नागरिक उपोषण करु.
– डॉ. अशोक कढणे (माजी ग्रामपंचायत सदस्य)
