कार पळवून नेणार्यांच्या आवळल्या मुसक्या

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कारचालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून आणि बंदुकीचा धाक दाखवून कार पळवून नेणार्या पाच जणांच्या जालना जिल्ह्यातून तालुका पोलिसांनी नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत.
![]()
राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबूराव मुजुमुल (वय 26, रा.परतूर, जि.जालना), पांडुरंग ऊर्फ ओम बबन वैद्य (वय 24, रा.जोगदंड मळा, जालना), मोहम्मद इरफान मलिक (वय 24, रा.पडेगाव, कासमवली दर्गा, औरंगाबाद), विशाल संजय जोगदंड (वय 20, रा.जोगदंड मळा, जालना), भागवत ऊर्फ संभ्या बालाजी राऊत (वय 20, रा.जोगदंड मळा, जालना), अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. 7 फेब्रुवारीला अतुल नाथा मिंडे (वय 36, धंदा कारचालक, रा.शिंदे, पो.वसुली, ता.खेड, जि.पुणे) हे शिर्डीमार्गे निळवंडे शिवारातून कारने (एमएच.14, जेएच.8207) या पाच जणांना घेऊन जात होते. या पाच जणांनी चालक मिंडे यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर मारहाण करून त्यांना निळवंडे शिवारात रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. त्यानंतर हे पाच जण कार व मोबाइल घेऊन पळून गेले. स्थानिकांना मिंडे जखमी अवस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी मिंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कार चोरी करणार्या पाच जणांना जालना येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार, दोन गावठी कट्टे, चाकू असा एकूण 10 लाख 02 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक फौजदार विजय खंडीझोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब औटी, पोलीस नाईक शिवाजी डमाळे, पोलीस नाईक राजेंद्र घोलप, पोलीस नाईक ओंकार शेंगाळ, वाहन चालक मनोज पाटील, पोलीस नाईक ज्योती दहातोंडे यांनी ही कारवाई केली.
