साकूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; चार शेळ्या केल्या ठार एक शेळी गंभीर जखमी तर बिबट्यास जेरबंद करण्याची शेतकर्‍यांची मागणी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर परिसरात बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जांबुत बुद्रुक रस्त्यावरील टावरे वस्ती येथील एका शेतकर्‍याच्या चार शेळ्या बिबट्याने ठार केल्या असून एक शेळी गंभीर जखमी केली आहे. ही घटना गुरुवारी (ता.18) पहाटे घडली आहे. यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, टावरे वस्ती येथील शेतकरी गुलाब बळवंत टावरे यांची घरासमोरच पत्र्याची मोठी शेड असून संरक्षक म्हणून पाच फूट लांब तारेची जाळीही ओढलेली आहे. तरी देखील गुरुवारी पहाटे बिबट्याने तारेवरुन उडी मारत शेडमध्ये घुसला आणि चार शेळ्या जागीच ठार केल्या. यामध्ये दोन बकर्‍यांचा समावेश असून एक शेळी गंभीर जखमी केली आहे.

सकाळी नेहमीप्रमाणे शेतकरी टावरे हे शेडकडे गेले असता तर समोरच त्यांना शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वन विभागाला दिली. यापूर्वीही बिबट्याने परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावून जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी गुलाब टावरे, प्रकाश टावरे, संजय चोपडा, बाळासाहेब रासने, अशोक दिघे, ज्ञानदेव दिघे, लक्ष्मण वाळुंज आदिंनी केली आहे.

Visits: 228 Today: 1 Total: 2121249

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *