संगमनेर तालुक्यात कोविड बाधितांची वाढ सुरूच! आजही शहरातील अठरा जणांसह एक्केचाळीस रुग्ण आढळले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्याभरापासून तालुक्यात सुरू झालेले कोविडचे संक्रमण दिवसोंदिवस उग्ररुप धारण करीत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत असल्याने शहरातील सर्व रुग्णालये तुडूंब झाली आहेत. त्यातच शासकीय डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आल्याने सामान्य आणि गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुट सुरु झाली आहे. कोविड रुग्णवाढीच्या श्रृंखलेत आजही तालुक्यात 41 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता साडेसात हजारांचा आकडा ओलांडून 7 हजार 508 वर पोहोचली आहे. तालुक्यात सध्या 339 रुग्ण सक्रीय आहेत.
केंद्र सरकारने राज्य सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारातून राज्यात कोविडचे दुसरे संक्रमण सुरु झाल्याची भीती व्यक्त केली आहे. रोज मोठ्या संख्येने राज्यभरातून समोर येणारे बाधित रुग्णही दुसर्या संक्रमणाचीच वर्दी देत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोविडची दुसरी लाट कोसळल्या सारखी स्थिती असून जिल्ह्यातील पाच तालुक्यात व त्यातही अहमदनगर शहर व संगमनेर तालुक्यातील कोविड स्थिती पुन्हा पूर्वगतीत आली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणची कोविड रुग्णालये तुडूंब झाली आहेत. पूर्वी तालुकापातळीवर सुरु असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स शासनाने बंद केल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय शिल्लक राहिलेले नाहीत. त्याचा गैरफायदा घेत काही खासगी रुग्णालयांनी अक्षरशः लुट सुरू केली असल्याचे चित्र सध्या दिसत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून तालुक्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा 41 जणांची नव्याने भर पडली. त्यात शहरातील विद्यानगरमधील 49 वर्षीय महिला, पद्मनगरमधील 86 वर्षीय महिलेसह 57 वर्षीय इसम व तीन वर्षीय बालक, जाणता राजा मैदानाजवळील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जनता नगरमधील 70 वर्षीय महिला, गोविंद नगरमधील 30 वर्षीय तरुणासह 24 वर्षीय महिला, रंगार गल्लीतील 24 व 20 वर्षीय तरुण, चैतन्य नगरमधील 5 वर्षीय बालिका, अभिनव नगरमधील 16 वर्षीय तरुणी, पंपींग स्टेशन परिसरातील 35 वर्षीय तरुण, गणेशनगर मधील 45 वर्षीय इसम, बाजारपेठेतील 45 व 20 वर्षीय महिला, इंदिरा नगरमधील 42 वर्षीय तरुण आणि संगमनेर असा पत्ता नोंदविलेला 32 वर्षीय तरुण अशा शहरातील एकूण पंधरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील 26 वर्षीय दोन महिला, खांडगाव येथील 35 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 47 वर्षीय इसम, कौठे कमळेश्वर येथील 49 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 57 वर्षीय इसमासह 31 वर्षीय तरुण आणि 55 व 22 वर्षीय महिला, घारगाव येथील 59 वर्षीय इसम, संगमनेर खुर्दमधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खणेगाव येथील 27 वर्षीय महिला, कौठे खुर्द येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोकणगाव येथील 89 वर्षीय वयोवृद्ध, पोखरी बाळेश्वर येथील 18 वर्षीय तरुण, समनापूर येथील 45 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 52 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 35 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 43 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 30 वर्षीय तरुण व वडगाव पानमधील 70 वर्षीय महिला अशा ग्रामीण भागातील 23 रुग्णांसह तालुक्यातील एकूण 41 जणांचे अहवाल आजरोजी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत सलग भर पडून ती आता 7 हजार 508 वर पोहोचली आहे. त्यातील 339 रुग्ण सध्या सक्रीय आहेत. आज 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
a
सामान्य रुग्णांसाठी शासनाने तालुकास्तरावर डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स सुरु केले होते. मात्र नववर्षाच्या प्रारंभी ते बंद करण्यात आले. घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शंभर रुग्णांची व्यवस्था होती, मात्र सध्या ती ठप्प असल्याने सामान्य आणि गरीब रुग्णांना उपचारांविना अथवा कर्ज काढून उपचार घेण्याची वेळ आली आहे. शहरातील काही खासगी रुग्णालये संधीचे सोने करतांना कोविड बाधित रुग्णांना लुटीत असल्याचेही आता समोर येवू लागले आहे.