संगमनेरच्या ‘विकासा’त सार्वजनिक बांधकामचा ‘खोडा’! वारंवार सांगूनही काम करीनात; शहर उपअभियंत्यावर कारवाईची गरज..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल दशकभरानंतर धूळखात पडलेले सिग्नल सुरु करुन शहराच्या बेशिस्तीला शिस्त लावण्यासाठी सामुहीक प्रयत्नांचा जागर सुरु झाला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेने त्यात खोडा घातला आहे. एकीकडे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासह रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पालिका कोट्यवधीचा खर्च करीत असताना दुसरीकडे शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेला हा विभाग मात्र ढिम्म होवून बसल्याने महामार्गावर खड्ड्यांचे राज्य तर, शहरातंर्गत गुळगुळीत रस्ते असे विरोधाभाशी चित्र सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे. उपअभियंता श्याम मिसाळ यांच्या मनमानी आणि निष्क्रिय कारभारामुळे शहरातील अनेक विकासकामांना ‘ब्रेक’ लागला असून भिंत हटवून झाडाचे पुनर्रोपण करण्यासह पालिका व पोलिसांनी वारंवार सांगूनही सिग्नलच्या दिशादर्शक रेषा आणि झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखून देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग दिरंगाई करीत असल्याने सिग्नल व्यवस्था कार्यान्वीत होवून पंधरवडा उलटल्यानंतरही पोलिसांना सक्तिने त्याचे संचालन करण्यास मर्यादा येत आहेत. बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक शहराच्या विकासकामात ‘खोडा’ घातला जात असून खूद्द आमदार अमोल खताळ यांनी थेट सभागृहात प्रश्‍न उपस्थित केल्यानंतरही या उपअभियंत्याच्या वागणुकीत कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची गरज आता व्यक्त होत आहे.


मागीलकाही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विशेष करुन उपअभियंता श्याम मिसाळ चांगलेच चर्चेत आहेत. या महाशयांनी कोणत्यातरी ‘अज्ञात’ कारणांनी केवळ आपल्या मधूर चेहर्‍यावर खोट्या हास्याची लकेर ठेवून संगमनेरच्या विकासात खोडा घालण्यासह पहिल्यांदाच शहराच्या बेशिस्त वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याच्या प्रयत्नांमध्येही बांधा आणण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. या अधिकार्‍याच्या मनमानी आणि निष्क्रिय वृत्तीमुळे शहर व परिसरातील अनेक कामे किरकोळ कारणांमुळे खोळंबून ठेवण्यात आली आहेत. अकोले बायपास रस्त्याने आल्यानंतर हॉटेल काश्मिरसमोरील बाजूने नाशिकरोडच्या दिशेने वळताना वाहनांना अडसर निर्माण होतो, त्या कारणाने सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहाच्या कोपर्‍याची सुरक्षा भिंत तोडून तेथील पिंपळाच्या झाडाचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय झाला.


पालिकेकडून सदरची भिंत तोडून आज महिना-दीड महिना उलटला, मात्र वारंवार मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागातील या निष्क्रिय उपअभियंत्याने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी आजही त्या वळणावरील झाडं आहे त्याच स्थितीत असून वाहनचालक जीव मुठीत धरुनच तेथून वळण घेत आहेत. मात्र त्याचे कोणतेही सोयतसुतक संबंधित अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाला नाही. तशीच स्थिती तब्बल दहा वर्षांनंतर सुरु झालेल्या सिग्नल व्यवस्थेबाबतही झाली असून जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आवाहनाला पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील बंद पडलेल्या सिग्नल यंत्रणोची दुरुस्ती करुन ते पंधरवड्यापूर्वीच पूर्ववत सुरु केले.

सदरचे दोन्ही सिग्नल राज्यमार्गाच्या दर्जावरील रस्त्यांवर असल्याने त्याचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्या कारणाने सुरुवातीला पालिकेने आणि त्यानंतर पोलिसांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करुन पुणे-नाशिक महामार्गावर दोन ठिकाणी व कोल्हार-घोटी महामार्गावर अकोलेनाका अशा तीन ठिकाणी सिग्नल सुरु झाल्याचे सांगितले. त्यावरुन संचालन करण्यासाठी वाहनांना थांबण्यासाठी निश्‍चित रेषा आणि माणसांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारुन देण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यालाही आता मोठा कालावधी उलटला, मात्र निष्क्रिय उपअभियंता श्याम मिसाळ यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संपूर्ण कार्यान्वीत होवूनही संगमनेरच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली असून त्यात जाणीवपूर्वक खोडा घालणार्‍या उपअभियंत्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी होत आहे.


तब्बल दहा वर्ष धूळखात पडून असलेल्या संगमनेरच्या वाहतूक सिग्नल व्यवस्थेला पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानंतर पुनर्जीवन मिळाले. पालिकेनेही आदेशाची तामीली करताना पोलिसांशी समन्वय करुन तत्काळ आवश्यक असलेल्या तीन ठिकाणचे सिग्नल दुरुस्त करुन दिले. मात्र त्यावरुन वाहतुकीचे संचालन करण्यासाठी वाहनांना थांबण्यासाठीची पांढरी रेषा आणि माणसांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आवश्यक असल्याने पंधरा दिवसांपूर्वीच या दोन्ही विभागांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करुन त्यांना सदरचे काम पूर्ण करुन देण्याची विनंती केली. मात्र भरपावसातही रस्ते बांधण्याचा विक्रम करणार्‍या या विभागाचे उपअभियंता श्याम मिसाळ पंधरा दिवसांपासून पावसाची कारणं सांगून सदरचे काम टाळीत असल्याने संगमनेरात त्यांच्या निष्क्रियतेवरुन संताप निर्माण झाला आहे. विकास कामात वारंवार खोडा घालणार्‍या या मुजोर अधिकार्‍यावर कारवाई करावी, प्रसंगी त्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा अशीही मागणी संगमनेरकरांमधून होत आहे.

Visits: 301 Today: 2 Total: 1101014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *