उन्हाळी आवर्तनाने घेतला विद्यार्थ्याचा बळी! पद्मनगरमधील पंधरावर्षीय मुलगा प्रवरापात्रात बुडाला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रवरेच्या उन्हाळी आवर्तनात निष्पापांचे बळी जाण्याची श्रृंखला यावर्षीही कायम असून मंगळवारी सायंकाळी प्रवरा नदीपात्रात एक पंधरावर्षीय विद्यार्थी बुडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेला 20 तासांहून अधिक कालावधी उलटूनही सदर विद्यार्थी अद्यापही सापडलेला नाही. यश कृष्णा आडेप असे नाव असलेला हा मुलगा मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बुडाला होता. तेव्हापासून त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने पद्मनगर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पद्मनगर वसाहतीमध्ये राहणारा यश आडेप आपल्या अन्य चौघा मित्रांसह सोमवारी (ता.16) सायंकाळी संगमनेर खुर्दजवळील प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी छोट्या पुलानजीक वाळूतस्करांनी केलेल्या खड्ड्यात त्यातील दोघे गटांगळ्या खाऊ लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी यश तेथे गेला. मात्र बुडणार्‍या त्या दोघांनी त्यालाच मिठी मारल्याने तो बुडाला. यावेळी परिसरात असणार्‍या एकाने पात्रात उडी घेत त्या दोघांना वाचवले, मात्र यशचा थांगपत्ता लागला नाही.

याबाबत त्याच्या कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्यांच्यासह त्याच्या मित्रमंडळींनी नदीकाठी धाव घेतली. सायंकाळी उशीराने तहसीलदार अमोल निकम, पालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांनीही नदीकाठी जावून पोहणार्‍यांच्या मदतीने बुडीताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबविल्यानंतर आज (ता.17) सकाळी सहा वाजेपासून संगमनेर खुर्दच्या पुलापासून ओझर बंधार्‍यापर्यंत पुन्हा त्याचा शोध सुरू झाला. मात्र वृत्तलिहेपर्यंत तो कोठेही आढळला नाही.

संगमनेरातील सह्याद्री विद्यालयात इयत्ता नववीत शिकणारा यश कृष्णा आडेप हा अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा होता. वर्गात सर्वांशी मिसळून राहण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याने मित्रांचा मोठा संच केला होता. तो नदीपात्रात बुडाल्याच्या वार्तेने त्याच्या शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तो वास्तव्यास असलेल्या पद्मनगर परिसरात तर अक्षरशः शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


दरवर्षी उन्हाळी आवर्तनात संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रात बुडीताच्या घटना घडत असतात. नदीपात्रात झालेले असंख्य खड्डे, अनियमित झालेले पात्र यामुळे चांगले पोहणार्‍यांनाही पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे शिकाऊ आणि पोहता न येणार्‍यांनी नदीपात्रात अंघोळीचा मोह टाळायला हवा असा संदेशच या घटनेने दिला आहे. या घटनेनंतर शहरालगतच्या पात्राजवळ ठिकठिकाणी सावधानतेचे फलक लावण्याची गरजही अनेकांनी व्यक्त केली आहे.

Visits: 99 Today: 2 Total: 1105604

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *