जोर्वे येथील एकाला गावातील जमावाची मारहाण दुचाकीही पेटविली; तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी जोर्वेनाका येथे आठ जणांना झालेल्या मारहाणीचे पडसाद दुसर्या दिवशी (ता.29) जोर्वे गावातही उमटले. मारहाणीच्या घटनेनंतर संतप्त गावकर्यांनी जोर्वे येथील एका दुचाकी दुरुस्तीच्या केंद्रासह चिकन विकणार्याच्या टपरीची तोडफोड केली. सदरचा प्रकार सुरु असतांना गावातच राहणारा महंमद फरीद हा आपल्या जोडीदारासह तेथून दुचाकीवरुन जात असतांना जमावाने त्यांच्यावरही चाल करुन त्याची दुचाकी पेटवून दिली तर त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात चौघांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सोमवारी (ता.29) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास जोर्वे गावच्या गावठाणात घडला. याच गावातील सोनार गल्लीत राहणारा व मूळ इस्लामपूर (पश्चिम बंगाल) येथील रहिवासी असलेला महंमद फकीर मसीबबुलहक हा तीस वर्षीय टेलर एका साथीदारासह आपल्या मोपेडवरुन (क्र.एम.एच.17/एस.3805) गावठाणातून घराकडे जात होता. यावेळी गावातील महाराष्ट्र चिकन नावाच्या जाकीर बशीर कसाई याच्या टपरीची तोडफोड करुन त्यातील सामान पेटवून दिले जात असल्याचे त्यांनी पाहीले.

त्याच सुमारास जमावाची नजर त्या दोघांवर गेल्याने त्यातील काहींनी ‘धराऽ.. धराऽ..’ म्हणत फिर्यादीला रोखले व त्याच्याकडून जबरदस्तीने त्याची दुचाकी हिसकावून घेत ते आधीच पेटवलेल्या जाळात झोकून दिली. यानंतर जमावातील चौघांनी महंमद फरीद याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. या घटनेनंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 324, 435, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.

रविवारी जोर्वे नाका येथे जमावाकडून मारहाण झालेले आठही जण जोर्वे येथील रहिवासी होते. या घटनेनंतर जोर्वे येथ मोठा तणाव निर्माण झाला होता, त्यातूनच सोमवारी (ता.29) संतप्त झालेल्या गावातील तरुणांनी गावठाणात असलेल्या एका दुचाकी दुरुस्तीच्या टपरीसह चिकन विके्रत्याची टपरी फोडून त्यातील सगळे सामान जाळून टाकले. त्याच संतापातून महंमद फरीद या टेलरिंगचा व्यवसाय करणार्या तरुणाला मारहाण करीत त्याची दुचाकीही पेटवण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर जोर्वे येथे तणावपूर्ण शांतता असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

