किरकोळ कारणावरुन विद्यार्थ्याला मारहाण! जातीय रंग देण्याचा प्रयत्न; प्रतिष्ठितांच्या मध्यस्थीने तणाव निवळला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविद्यालयातील पायर्यांवर एकमेकांना धक्का लागल्याचे पर्यवसान एकाला रस्त्यात अडवून तिघांकडून मारहाण करण्यात झाले. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूचा जमाव गोळा झाला होता. त्यातच विद्यार्थ्यांच्या या भांडणांना काहींनी जातीय रंग देण्याचाही प्रयत्न केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वठवलेली भूमिका आणि दोन्ही बाजूंच्या प्रतिष्ठीतांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मारहाण करणार्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत संगमनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.11) दुपारी पावणे पाचच्या सुमारास तिरंगा चौकात घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीत महाविद्यालय सुटल्यानंतर पायर्या उतरणार्या दोन भिन्न समाजाच्या तरुणांचा एकमेकांना धक्का लागला. गर्दीच्यावेळी असे प्रकार नियमित असले तरी यावेळी मात्र या किरकोळ गोष्टीने वेगळेच वळण घेतल्याने त्यात गांभीर्य निर्माण झाले. या घटनेनंतर दोघा तरुणांमध्ये महाविद्यालयाच्या आवारातच शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. मात्र महाविद्यालयाची सुट्टी झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकही आवारात असल्याने त्यावेळी हा वाद सोडवण्यात आला.
मात्र यातील एका गटातील तरुणांनी वाद झालेल्या कुरणमधील ‘त्या’ अल्पवयीन विद्यार्थ्याला धडा शिकवण्यासाठी महाविद्यालयाच्या पाठीमागील प्रवेशद्वारातून कुरणकडे जाणार्या रस्त्यावरील तिरंगा चौकात त्याला तिघांनी अडविले आणि ‘तुम्ही पुन्हा या रस्त्याने जायचे नाही!’ असा दम भरीत सतरावर्षीय विद्यार्थ्याला हाताच्या चापटीने मारहाण करीत शिवीगाळ व दमबाजी केली. या घटनेनंतर काही वेळातच शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण झालेल्या तरुणाच्या समर्थनार्थ जमाव जमला. याची माहिती मिळताच दुसर्या बाजूचा जमावही गोळा झाला. त्यामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले होते.
विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेले किरकोळ वाद असल्याने त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याचा विचार करण्याचा एक मतप्रवाह देखील यावेळी समोर आला. मात्र एका बाजूकडून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरु लागल्याने अखेर मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही बाजूच्या काही प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घेत सामंजस्याची भूमिका घेतली व या वादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होवू नये अशी अपेक्षा व्यक्त करीत महाविद्यालयाच्या परिसरात पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी थेट रस्त्यात अडवून मारहाण करणार्या तरुणांवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार कुरण येथे राहणार्या सतरावर्षीय विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आदित्य कानकाटे (रा.नेहरु चौक), जय घेगडमल (रा.कासारा दुमाला) व जयेश विठ्ठल सोनवणे (रा.नाशिक रोड) या तिघांवर मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हाची नोंद करीत जय घेगडमल व जयेश सोनवणे यांच्यावर सीआरपीच्या कलम 151 (1) नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली. या घटनेने शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तत्काळ वठवलेली भूमिका आणि दोन्ही बाजूच्या समंजस नागरिकांनी घेतलेला पुढाकार यामुळे हा प्रकार विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या किरकोळ वादापर्यंत मर्यादित राहीला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता झालेल्या या वादाचे प्रतिध्वनी मध्यरात्रीपर्यंत शहराच्या विविध भागातून कानावर येत होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जमलेल्या दोन्ही बाजूच्या जमावामुळे वातावरणही तणावपूर्ण बनले होते. एकाबाजूच्या काहींनी मारहाण करणार्यांवर कठोर कारवाई करुन त्यांना अटक करण्याचीही मागणी केली, त्यातून तणावात भर पडत होती. मात्र रात्री उशिराने पोलिसांनी दोन्ही बाजूच्या काही प्रतिष्ठितांशी चर्चा करुन तिघांवर गुन्हा दाखल करीत त्यातील दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली व जातीय रंग देवून शहराचे वातावरण खराब करु पाहणार्यांना पिटाळून लावल्याने मध्यरात्रीच्या सुमारास वातावरणातील तणाव पूर्णतः निवळला.