एकाच बेडवर तीन पिके काढण्याचा करिष्मा! खांडगाव येथील तरुण शेतकरी संदीप गुंजाळ यांचा प्रयोग
नायक वृत्तसेवा, अकोले
प्रवरामाईमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावे सुजलाफ-सुफलाम झाले आहेत. ऊस आणि भाजीपाला पिकांनी येथील शेतकर्यांची आर्थिक क्रांती झाली आहे. कितीही नैसर्गिक संकटे आली तरी त्यातून मोठ्या हिमतीने सावरुन यशस्वी होण्याचा उत्तम वस्तुपाठही येथील शेतकर्यांनी घालून दिला आहे. यात अग्रक्रमाने खांडगावच्या संदीप गवराम गुंजाळ या शेतकर्याचे घ्यावे लागेल. त्यांनी हातातून गेलेले पीक पुन्हा जोमाने फुलवून आणि एकाच बेडवर तीन यशस्वी पिके काढण्याचाही करिष्मा केला आहे.
खांडगाव येथील तरुण व प्रयोगशील शेतकरी संदीप गुंजाळ हे सातत्याने भाजीपाला पिकांसह झेंडूची लागवड करतात. त्यासाठी मोठे कष्टही उपसतात. यावर्षी त्यांनी चार एकरवर फ्लॉवरची लागवड केली. परंतु, गारपीट व अवकाळीच्या तडाख्यात सापडली. फ्लॉवरचे केवळ बुडखे शिल्लक राहिले होते. यामुळे हतबल न होता उलट दुप्पट ताकदीने त्यांनी वाटेकरी शेतकर्यांना सोबत घेवून लढा दिला. हीच फ्लॉवर अपार मेहनत करुन फुलविली. आव्हानांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी सदैप तत्पर असल्याचा नवा सिद्धांतच त्यांनी मांडला. त्याप्रमाणे फ्लॉवरला नवसंजीवनी दिल्याने सध्या तिची काढणी सुरू असून, प्रतिकिलोला 20 ते 25 रुपयांचा दर मिळत आहे. ही संघर्षगाथा इथेच थांबत नाही.
डिसेंबर महिन्यात अडीच एकरावर कारल्याची मल्चिंग पेपरचा वापर करुन लागवड केली. यासाठी साधारण 1 लाख 80 हजारांचा खर्च केला. त्यातही कष्ट उपसल्याने सुमारे 40 टनाच्या आसपास उत्पादन निघाल्याने 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हे पीक काढल्यानंतर 15 फेब्रुवारीला कलिंगडाची लागवड केली. त्यासाठी 1 लाख 20 हजाराचा खर्च केला. त्यातूनही सुमारे 60 टन उत्पादन निघाल्याने 5 लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळाले. यानंतर 1 मे रोजी झेंडूची लागवड केली. त्यासाठी देखील 1 लाख 20 हजार रुपयांचा खर्च केला. आत्तापर्यंत दहा तोडे झाले असून सुमारे 20 टन उत्पादन तर 6 लाखाचे उत्पन्न निघाले आहे. तर 20 टन उत्पादनाची अपेक्षा असून अजून 6 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
एकाच बेडवर तीन यशस्वी पिके काढण्यासाठी त्यांनी स्वतःचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. ताकदवान बेसल डोस, जोमदार पूर्वतयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बिगर हंगाम हे सर्वसाधारण सूत्र त्यांनी तयार केलेले आहे.
शेतकर्यांनी सातत्याने नवनवीन पिकांना प्राधान्य दिले पाहिजे. याशिवाय नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातून पुन्हा सावरले पाहिजे. तरच शाश्वत उत्पन्नाची हमी मिळेल.
– वीरेंद्र थोरात (संचालक-विश्व हायटेक नर्सरी, वीरगाव)
शेतीमध्ये सातत्य व संयम आवश्यक आहे. संकटावर मात करुन संदीप गुंजाळ यांनी आदर्श निर्माण केला आहे. इतर शेतकर्यांनी देखील त्यांचे अनुकरण करावे.
– प्रवीण गोसावी (तालुका कृषी अधिकारी)