जांबुतमध्ये शेतकर्यांनी वाचविला हरणाचा जीव

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांबुत बुद्रुक येथील एका चाळीस फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला शेतकर्यांनी सुखरूप बाहेर काढत पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. ही घटना शनिवारी (ता.13) सकाळी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, जांबुत बुद्रुक शिवारात यशवंत मेंगाळ, नामदेव मेंगाळ, नारायण मेंगाळ व फारूक सय्यद या चौघा शेतकर्यांची एकत्रित विहीर आहे. शनिवारी सकाळी हे सर्वजण विहिरीपासून काही अंतरावर होते. त्याचवेळी हरीण विहिरीत पडले हे सर्व दृश्य पाहून शेतकर्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर शेतकर्यांनी हरणाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. परंतु, त्याच्या पायाला जखम झाली होती. शेतकर्यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनसेवक रोहिदास भोईटे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी हरणाच्या पायावर औषधोपचार करून त्याला पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.
