संकटातही राज्य सरकारची शेतकरी व सामान्यांना मोठी मदत ः थोरात
संकटातही राज्य सरकारची शेतकरी व सामान्यांना मोठी मदत ः थोरात
संगमनेर-अकोले रस्त्याच्या मजबुतीकरण, रुंदीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकर्यांना 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी केली. त्यानंतर कोरोना संकट, निसर्ग चक्रीवादळ, सततचा पाऊस असे विविध संकटे व लॉकडाऊनमुळे मंदावलेली आर्थिक स्थिती असतानाही हे सरकार कायम शेतकरी व सर्वसामान्यांच्या पाठिशी उभे राहिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून संगमनेर-अकोले हा रस्ता मुंबई वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धांदरफळ बुद्रुक येथील धांदरफळ फाटा येथे संगमनेर-अकोले रस्त्याच्या मजबुतीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, माजी सभापती निशा कोकणे, संपत डोंगरे, विष्णूपंत रहाटळ, अजय फटांगरे, वसंत देशमुख, विश्वास मुर्तडक, बाळासाहेब देशमाने, अनिल काळे, अॅड.अनिल कासार, विलास कवडे, सुरेश खुरपे, बालम तांबोळी, अनिल देशमुख, सरपंच भानुदास शेटे, किशोर टोकसे, उपसरपंच पूजा तोरकडी, अॅड.बाबासाहेब गायकर, डी.एम.लांडगे, भास्कर सिनारे, विनोद हासे, आत्माराम हासे, अवधूत आहेर, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी स्वाती दराडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले की, एक वर्षापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. सत्तास्थापन मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप काळ गेला. मार्चपासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती मंदावली. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ विदर्भातील पूर परिस्थिती आणि आता सततचा पाऊस यामुळे संकटामागून संकट येत असताना लॉकडाऊनमध्ये उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद असतानाही महाराष्ट्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी हेक्टरी 10 हजार रुपये व फळबागांकरिता हेक्टरी 25 हजार रुपये अशी दहा हजार कोटींची भरघोस मदत शेतकरी व सर्वसामान्यांसाठी जाहीर केली आहे. या सर्व काळात आर्थिक अडचण असतानाही आपण अकोले व संगमनेर रस्त्याचे अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामासाठी प्राधान्याने निधी मिळवून या कामाची सुरुवात केली आहे. या रस्त्यामुळे या क्षेत्रातील अनेक गावांना वाहतुकीसाठी मोठा लाभ होणार असून संगमनेर-अकोले मुंबईकडे जाणार्या वाहतुकीला व शेतकर्यांसाठी याचा मोठा लाभ होणार आहे. कमी वेळेत हे अंतर पार होणार असल्याने शेतकर्यांसाठी मोठा फायदा होणार आहे. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केले. शेवटी कारखान्याचे संचालक अनिल काळे यांनी आभार मानले.

महानंदच्या पुढाकारामुळे दूध उत्पादकांना दिलासा…
दुग्ध विकासमंत्री सुनील केदार व महानंदचे अध्यक्ष रणजीत देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारने अतिरिक्त झालेल्या दहा लाख लिटर दुधाची दूध पावडर बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. नाही तर या अतिरिक्त दुधामुळे बंद घ्यावा लागला असता. दूध पावडर आजही दूध संघात मोठ्या प्रमाणात पडून आहे. महानंदच्या पुढाकारामुळे दूध उत्पादकांना कोरोना संकटात मोठा दिलासा मिळाला आहे.

