नेवासा तालुक्यात महाशिवरात्री साध्या पद्धतीने साजरी कोरोनामुळे शिवभक्तांनी घरीच बसून केली शिव उपासना
नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरासह तालुक्यात महाशिवरात्री साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक शिवभक्तांनी घरीच बसून शिवलीलामृताचे पारायण करून शिव उपासना केली. तसेच परिसरात असलेल्या शिवालयात जाऊन सुवासिनींनी बेल अर्पण करून दुग्धाभिषेक घातला. नेवासा शहराच्या पूर्वेस पुरातन महिमा असलेल्या मध्यमेश्वर शिव मंदिरात सकाळी बाल योगी ऋषीनाथ महाराज यांच्या हस्ते शिव लिंगास दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी बहिरवाडी येथील रामनाथ महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली दहा भाविकांच्या उपस्थितीत शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण झाले. दुपारच्या सत्रात येथे दर्शनासाठी आलेल्या मोजक्याच भाविकांना शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला.
तसेच शहरातील प्रवरानदी काठी असलेल्या श्री काशीविश्वेश्वर व गोकर्णेश्वर मंदिरात युवकांनी एकत्रित येऊन शाबुदाना खिचडीचे वाटप केले. येथे देखील विधीवत पुजेने अभिषेक घालण्यात येऊन साध्या पद्धतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. आणि टोका येथील श्री सिध्देश्वर मंदिर प्रांगणात भरणारी यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली होती. महंत 1008 बाल ब्रह्मचारी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली येथे भक्त मंडळाच्या उपस्थितीत सिद्धेश्वर शिवलिंगाची दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक घालून विधीवत पूजा करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी येथे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. तर सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावर बॅरीकेट लावण्यात येऊन वाहनांसाठी रस्ते बंद करण्यात आले होते. तर श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथेही साध्या पद्धतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. महंत मुक्तानंद गिरी महाराजांच्या हस्ते शिवलिंगाची विधीवत पूजा करण्यात आली.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सुवासिनींनी घरी बसून वाळूचे शिवलिंग तयार करून विधीवत पूजन केले. घरोघरी ओम नम: शिवायचा जप शिवभक्तांनी केला. बर्याच शिवालयात गर्दी नसल्याचे चित्रही पहावयास मिळाले. तर सामाजिक अंतराचे पालन करा, मास्क लावा अशा सूचना छोट्या शिवमंदिरामध्ये करण्यात येत होत्या.