रविवारी उद्योगपती माधवलाल मालपाणी स्मृती सफायर मॅरेथॉन सलग अकराव्या वर्षी शेकडो संगमनेरकर उत्साहाने धावणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू उद्योगपती स्व. माधवलाल मालपाणी यांच्या स्मरणार्थ रविवारी (ता.११) सकाळी ७ वाजता लायन्स क्लब संगमनेर तर्फे येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी विनामूल्य आहे. संगमनेरमधील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, युवक युवती, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लायन्स क्लब संगमनेरचे संस्थापक अध्यक्ष व मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांनी केले आहे.

नियमित चालणे, धावणे हे व्यायाम निरोगी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस स्वतःसाठी देऊन धावण्याच्या व्यायाममधून चांगल्या सवयी शरीराला लागव्यात. निरोगी आयुष्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. असा संदेश या मॅरेथॉन स्पर्धांमधून जगाला दिला जातो. व्यायामाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असणारे आणि अनेकांच्या मनात गोडी निर्माण करणारे स्व. माधवलाल मालपाणी यांच्या स्मरणार्थ संगमनेरमध्ये अकराव्या सफायर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यामागे हाच हेतू असल्याची माहिती लायन्स क्लब संगमनेर सफायरचे अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा आणि खजिनदार कल्पेश मर्दा यांनी यांनी दिली आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेत ७ किलोमीटर व १० किलोमीटर अश दोन प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही मॅरेथॉन पूर्ण करणार्या प्रत्येक स्पर्धकाला पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. ७ किलोमीटरमध्ये नाशिक रस्त्यावरील मालपाणी लॉन्सपासून ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज ते पुन्हा सह्याद्री कॉलेज असा मार्ग असेल तर १० किलोमीटरमध्ये बसस्थानक ते अमृतवाहिनी कॉलेज ते पुन्हा हॉटेल काश्मीर टी सेंटर असा मार्ग असणार आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार असून सर्व वयोगटातील मुले-मुली, महिला-पुरुष सहभागी होऊ शकतात अशी माहिती प्रकल्प प्रमुख सुनीता मालपाणी, कल्याण कासट, सुमित मणियार, चैतन्य काळे, कृष्णा आसावा, प्रकल्प संयोजक श्रीनिवास भंडारी, राजेश मालपाणी, महेश डंग, अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांनी दिली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी करण्याचे आवाहन लायन्स क्लब सफायर संगमनेरतर्फे करण्यात आले आहे.
