अवैध दारू विक्रीबाबत कोठे बुद्रूकमध्ये ग्रामस्थांचे उपोषण
अवैध दारू विक्रीबाबत कोठे बुद्रूकमध्ये ग्रामस्थांचे उपोषण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रूक गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून पोपट खंडू भालके यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजपासून (बुधवार ता.16) आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास संपूर्ण ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पासून कोठे बुद्रूक गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री केली जाते. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. यासोबत गुटखा विक्री आणि जुगारही कायमस्वरूपी बंद व्हावे म्हणून ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून देऊन पाठपुरावा केला आहे. तसेच ग्रामसभेत ठरावही घेण्यात आला आहे. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आजपासून हे उपोषणाचे सुरू झाले असून उपोषणस्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी किशोर लाड, चव्हाण याबरोबरच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र जोपर्यंत गावातील अवैध व्यवसाय बंद होत नाही आणि अवैध धंदेवाल्यांविरोधात कडक कारवाई होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. उपसरपंच संपत जाधव, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ भालके, माजी सरपंच नाना भालके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शांताराम वाकळे, अनिल वाकळे, शिवाजी भालके आदि उपोषणस्थळी उपस्थित होते. दरम्यान पठारभागातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत. परंतु संबंधित विभाग याकडे कानाडोळा करत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.