संगमनेर तालुक्यात आजही आढळले अठरा बाधित रुग्ण! गेल्या पाच दिवसांत पहिल्यांदाच समोर आली खालावलेली रुग्णसंख्या

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 1 मार्चपासून दररोज रुग्णवाढीचा विक्रम करणार्‍या कोविडने आजच्या आकडेवारीतून संगमनेरकरांना काहीसा दिलासा दिला आहे. रोजच्या उच्चांकी रुग्णसंख्येत आज शहरातील अवघ्या आठ जणांसह एकूण अठरा जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आजही हलतीच राहिली आहे. तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. त्याला नियम झुगारुन साजरे होत असलेले विवाह सोहळे कारणीभूत आहेत. मात्र त्यानंतरही अशा सोहळ्यांवर वाढत्या रुग्णसंख्येचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे शुक्रवारी समोर आले आहे.

नववर्षात संगमनेरातील कोविड संक्रमणाला जवळपास ओहोटी लागली होती. मात्र फेब्रुवारीत काही पांढरपेशांनी नियमांची पायमल्ली करुन आपल्या कुटुंबातील लग्न सोहळे उरकले, त्याचा आदर्श घेवून शहर आणि तालुक्यातील अनेकांनी तोच कित्ता गिरवल्याने तालुक्याची कोविड स्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली असून दररोजच्या रुग्णवाढीने कोविड केअर सेंटर्ससह शहरातील रुग्णालयेही तुडूंब झाली आहे. असे असतांनाही शुक्रवारी तालुक्यातील पिंप्रीलौकी-आझमपूर येथे एक विवाह सोहळा अगदी धुमधडाक्यात साजरा झाला. याबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर विवाहस्थळी तपासणी पथक पोहोचले. तोवर बहुतेक पाहुणे मंडळी निघून गेलेली होती. तरीही नियमांचे उल्लंघन होईल आणि दंडात्मक कारवाईस पात्र राहीली इतकी उपस्थिती कायम असल्याने पथकाने वधुच्या पित्याला पाच हजारांचा दंड केला. या कारवाईने काहीकाळ गोधळ झाला असला तरीही त्यातून संबंधितांनी कोणता बोध घेतला असेल हा संशोधनाचा विषय आहे.

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत असल्याने तालुक्यात कोविडबाबत पुन्हा गांभीर्य निर्माण झाले आहे. मात्र आज (ता.6) रोजच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने संगमनेरकरांना काही प्रमाणात क्षणिक दिलासा मिळाला आहे. आज एकूण अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यात शहरातील आठ तर ग्रामीणभागातील दहा जणांचा समावेश आहे. शहरातील इंदिरानगर मधील 76 वर्षीय महिला, रंगारगल्लीतील 35 वर्षीय तरुण, मालदाडरोडवरील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 वर्षीय इसम, वकील कॉलनीतील 45 वर्षीय महिला, मेनरोडवरील 22 वर्षीय तरुण, सह्याद्री महाविद्यालय परिसरातील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व गोविंदनगरमधील 35 वर्षीय तरुण. ग्रामीणभागातील पोखरी हवेली येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी येथील 54 वर्षीय इसम, झोळे येथील 54 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण आणि 26 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 43 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 54 वर्षीय इसमासह 34 व 21 वर्षीय तरुण व घारगावमधील 43 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज आढळलेली रुग्णसंख्या रोजच्या सरासरीपेक्षा कमी असल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Visits: 5 Today: 2 Total: 30436

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *