देवस्थानच्या अडीचशे एकरवर पदाधिकार्यांचा डल्ला? नोटरी करुन रेकॉर्डमध्ये हेराफेरी; तालुक्यातील पिंपळे ग्रामस्थांचा आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या देशात प्राचीन काळापासून देवस्थानांना जमिनी दान करण्याची परंपरा आहे. अशा जमिनी ‘देवस्थान इनाम’ किंवा ‘देवस्थान इस्टेट’ म्हणून ओळखल्या जातात. मंदिरांना स्वतःचे कोणतेही उत्पन्न नसल्याने त्यांचा दैनंदिन खर्च, पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि लोककल्याणाची कामे पार पाडता यावीत यासाठी अशाप्रकारचे दान केले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षात, विशेषतः ग्रामीण भागात याच इनाम जमिनी राजकीय आणि ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकार्यांच्या गैरकृत्यांचे लक्ष्य ठरत असून देवस्थानाच्या नावावर असलेली तब्बल अडीचशे एकर जमिन नोटरीद्वारा व्यवहार आणि परस्पर नोंदी करुन पदाधिकार्यांनीच गिळल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील पिंपळ्यातूनही समोर आला आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरु असलेल्या या गैरव्यवहारात इनाम जमिनींची स्टोनक्रशर चालकांना विक्री करुन कोट्यवधी रुपयांची अफरातफरही झाली असून या महाघोटाळ्यात स्थानिक पातळीवरील पदाधिकार्यांसह काही ‘मोठ्या’ नावांचाही समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन देवस्थानची जमिन परत मिळावी व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी गावातील दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हिम्मत दाखवून उपोषणाचा मार्गही पत्करला आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून चक्क देवस्थानच लाटण्याचा महाघोटाळा उघड होण्याची दाट शक्यता असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

पारंपरिक दुष्काळी असा शिक्का बसलेल्या पिंपळे या डोंगराळ भागातील गावात पंढरीच्या विठ्ठल-रुक्माईचे जुने देखणे मंदिर आहे. या परिसरातील जानकूबाबा ढोणे या दिवंगत दानशूर सद्गृहस्थांनी मंदिराच्या व्यवस्थेसाठी थोडी नव्हेतर तब्बल 250 एकर
जमिन दान दिली होती. त्यावेळी देवस्थानांचा कारभार बघणं म्हणजे देवकार्य मानले जायचे, त्यामुळे माणसं मनापासून अतिशय प्रामाणिकपणे आपापल्या जबाबदार्या पूर्ण करीत. त्यानुसार पिंपळ्यातील या मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी त्यावेळी मंदिर समितीची स्थापना केली गेली. त्यांच्या द्वाराच अनेक वर्ष पिंपळ्यातील या देवस्थानाची व्यवस्था पार पडायची. कालांतराने जानकूबाबांचे निधन झाले, त्या पाठोपाठ मंदिर विश्वस्त मंडळातील अन्य सदस्यही वयोमानाने जगाचा निरोप घेवून गेले.

विश्वस्तांच्या निधनाने पंचकमिटीतील सदस्यसंख्या कमी होत असताना त्याची पुन्हा पूर्तता करण्याची प्रक्रिया करण्यासाठी मात्र कोणीही पुढे आले नाही. परिणामी काही वर्षांनी या मंदिराच्या व्यवस्थेचा भार ग्रामपंचायतकडे आला. मात्र गेल्या दोन दशकांत पिंपळ्याच्या ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवणार्या ‘काही’ पदाधिकार्यांनी मनातील देवभाव खुंटीला टांगून संगनमताने मंदिराच्या मालकीच्या तब्बल अडीचशे एकर जमिनीला डोळा लावला. हा संपूर्ण परिसर डोंगराळ असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात
दगडांच्या खाणी आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात गौणखनिज काढता येणं शक्य असल्याने फार पूर्वीपासूनच या भागावर भू-माफियांची नजर होती. त्यामुळे मनात लालसा जागलेल्या त्या-त्या वेळच्या ‘काही’ पदाधिकार्यांनी संगनमताने त्या जमिनीच्या मूळ वहिवाटदार किंवा त्यांच्या वारसदारांना शोधून, त्यांना आमिष दाखवून, प्रसंगी ‘मयत व्यक्तिलाही जिवंत करुन’ तिच्या अंगठ्याने नोटरी नोंदवली गेली.

तलाठी, ग्राम सेवकासारख्या स्थानिक कर्मचार्यांना हाताशी धरुन नोटरीच्या आधारे सातबार्यावर फेरफार नोंदवून देवस्थानाच्या नावासमोर ‘नवीन खरेदीदार’ अशी नोंद करुन रेकॉर्डमध्ये बदल केला गेला. देवाच्या जमिनीला नाव लागल्यानंतर या जमिनी
स्टोनक्रशर चालकांना कोट्यवधी रुपयांना विकण्यात आल्या. त्या बदल्यात इवल्याशा पिंपळे गावात दोन-चार नव्हेतर तब्बल 15 स्टोनक्रशर सुरु झाले. त्यांच्या आधुनिक मशिनरीद्वारा दररोज उभ्या डोंगरांचा भूगा होवू लागला. खाणपट्टा दोनशे मीटरचा आणि प्रत्यक्षात उत्खणन पाच हजार मीटरपर्यंत असे दृष्य सर्वत्र निर्माण होवू लागले.

दिवसरात्र मशिनरीचा आवाज, त्यातून उठणारे कचमिश्रीत धुळीचे लोळ, एकाच ठिकाणी अनेक क्रशर सुरु असल्याने अहोरात्र सुरु असणारी ढंपरसारख्या अवजड वाहनांची वाहतूक, त्यातून वारंवार घडणारे अपघात, रस्त्यांची दयनीय अवस्था, देवस्थानच्या जमिनीतून परस्पर गौणखनिजाच्या चोरीतून लायकीपेक्षा अधिक अधिक पैसा हातात आल्याने वाढलेली दादागिरी अशा अनेक
कारणांनी पिंपळेतील नागरिक आता वैतागले आहेत. त्यांनी या दूष्कृत्याला हळूहळू विरोध करण्यास सुरुवात केली असून गावातील अण्णासाहेब चकोर आणि रमेश ढोणे हे दोघे सामाजिक कार्यकर्ते हिम्मत दाखवून पुढे आले आहेत. या दोघांनी ग्रामपंचायतीच्या मनमानी विरोधात उपोषणाला सुरुवात केली असून त्यांना बहुतांशी गावकर्यांचा सूप्त पाठींबा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच त्यांच्या या आंदोलनाचे स्वरुपही वाढण्याची शक्यता आहे.

हजारों भाविकांची श्रद्धा असलेल्या देवस्थानांमध्ये होणारा अशाप्रकारचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार आस्थेवरच घाव घालणारा आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या प्रकाराकडे अधिक गांभीर्याने लक्ष घालून पिंपळे ग्रामपंचायतीच्या गेल्या दोन दशकांच्या कारभाराची सखोल चौकशी करुन देवस्थानाची लाटलेली 250 एकर जमिन परत मिळवून त्यातून परस्पर उत्खणन केलेल्या
लाखों ब्रास गौणखनिजाच्या बदल्यात रॉयल्टी वसुल करावी व या परिसरातील सर्व स्टोनक्रशर कायमस्वरुपी बंद करावेत अशी मागणी वरील दोघांनी केली आहे, त्याची दखल घेवून प्रामाणिकपणे कालबद्ध चौकशी झाल्यास संगमनेर तालुक्यातील पिंपळेतून ‘महाघोटाळा’ उघड होण्याची शक्यता आहे.

कायद्यानुसार देवस्थानची जमिन कोणत्याही व्यक्तिला विकता येत नाही, त्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. मात्र अलिकडे फोफावलेले भू-माफिया अशा स्थानिक हस्तकांना हाताशी धरुन ‘इनाम’ जमिनीचे मूळ वहिवाटदार किंवा त्यांच्या वारसांना शोधून काढतात. त्यांना कमी किंमतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बनावट करारपत्र तयार करुन घेतले जाते. स्थानिक नोटरीद्वारा त्याला प्रमाणित केले जाते. खरेतर नोटरीची प्रक्रिया
केवळ कागदपत्रांच्या सत्यतेपूरतीच मर्यादीत आहे, त्याद्वारे मालकी हक्काचे हस्तांतरण होत नाही. मात्र त्या उपरांतही नोटरीच्या आधारावर जमिनींवर मालकीहक्क सांगितला जातो. या प्रक्रियेत मूळ वहिवाटदाराचे नाव कायम असले तरीही ‘नवीन खरेदीदारा’चे नाव मात्र अनधिकृतपणे नोंदवले जाते. त्यानंतर तलाठी अथवा ग्रामसेवकाला हाताशी धरुन याच नोटरीच्या आधारे फेरफार नोंदवून देवस्थानाच्या नावासमोर ‘नवीन खरेदीदारा’चे नाव लावून रेकॉर्डमध्ये बदल केला जातो.

