ऊस नोंद व तोडीवरुन शिवसेना-भाजपमध्ये रंगला कलगीतुरा! मुळा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पेटवून दिल्याचे प्रकरण
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सोनई येथील मुळा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सध्या उसाची नोंद आणि तोडीच्या विषयावरुन शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ऊस पेटवून देण्याचे आंदोलन किती खरे व किती खोटे यावर शीतयुद्ध सुरू झाले आहे.
मागील महिन्यात करजगाव येथील अशोक टेमक या शेतकर्याने मुळा कारखाना ऊसाची नोंद घेत नाही व तोडही देत नाही म्हणून अडीच एकर उसाचे पीक पेटून दिले होते. येथून दोन गटांत सुरू झालेला कलगीतुरा आजही सुरूच आहे. गुरुवारी (ता.4) हनुमानवाडी शिवारात ऋषीकेश शेटे यांनी दीड एकर उसाचे पीक पेटवून दिले. महाविकास आघाडी सरकार व संबंधित मंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला.
करजगाव येथे दोन एकर उसाला भरपूर पाणी देवून केवळ 20 गुंठे उसाचे पीक पेटवून दिले. तर शेटे यांनी निम्याहून अधिक मधला ऊस आधीच तोडून अहमदनगरला चार्यासाठी विकल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्ते करत आहेत. पुरावा म्हणून त्यांनी छायाचित्र व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. आंदोलक शेतकर्यांनी लगेचच खुलासा करत अंगावर आलेली बाजू सावरण्याचा प्रकार विरोधक करत असल्याचे सांगितले.
ऊसतोड व नोंद न घेण्याच्या कारणावरुन सुरू झालेल्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात रंगत आहे. कार्यक्षेत्रात यंदा चौदा लाख मेट्रीक टन ऊस असून आत्तापर्यंत नऊ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. उन्हाची तीव्रता वाढून पाणी कमी पडू लागल्याने उसतोडीसाठी सर्वच शेतकरी प्रतीक्षेत आहे. यातच उसाचे पीक पेटवून आंदोलन सुरू झाल्याने घरा-दारात तेवढीच चर्चा ऐकण्यास मिळत आहे. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख या प्रश्नात गुंतून न पडता रस्ते आणि वीजेच्या प्रश्नासाठी अधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.