नऊ महिन्यानंतर ‘लव्ह जिहाद’चा सूत्रधार सुटला! तालुक्याच्या पठारभागातील प्रकरण; युसुफ चौघुलेला ‘सुप्रीम’कडून जामिन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील 19 वर्षीय विद्यार्थीनीचे बळजबरीने अपहरण, मुंबईत नेवून धर्मांतरण करुन निकाह आणि अत्याचार प्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून कारागृहात असलेल्या या प्रकरणाच्या सूत्रधाराला अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. गेल्यावर्षी 7 जुलैरोजी घडलेल्या या घटनेचा गुन्हा 27 जुलैरोजी दाखल होताच घारगाव पोलिसांनी मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौघुले याला श्रीरामपुरातून अटक केली होती. तर, उर्वरीत दोघा ज्ञात आरोपींसह पाचजण पसार झाले होते. अटक सूत्रधाराच्या चौकशीतून सर्व आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मुंबई, गुजरातसह अनेक ठिकाणी छापे घातले. त्यातून आणखी दोघांना अटक झाली. मात्र गेल्यावर्षीच त्या दोघांचीही जामिनावर सुटका झाली. मात्र या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ युसुफ चौघुले याला कोठूनही दिलासा मिळाला नव्हता. उच्च न्यायालयाने त्याला जामिन देण्यास नकार दिल्यानंतर चालूवर्षी फेब्रुवारीत त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्याला घारगाव पोलिसांकडून कडाडून विरोधही झाला. मात्र दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला सशर्त जामिन मंजूर केला असून नऊ महिन्यानंतर अखेर त्याची सुटका झाली आहे.

तालुक्याच्या पठारभागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्या एका 15 वर्षीय विद्यार्थीनीला आरोपी युसुफ दादा चौघुले याने घारगावमधील आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले होते. हा प्रकार महिन्याभरातच पीडित मुलीच्या घरी समजल्याने त्यांनी दोघांचीही खरडपट्टी काढून या ‘पूर्वनियोजित’ प्रेमप्रकरणावर माती टाकली. वर्षभरानंतर पीडित तरुणी पुढील शिक्षणासाठी संगमनेरला येवून वसतीगृहावर राहत असताना आरोपी शादाब तांबोळीने कुणाल विठ्ठल शिरोळे याच्या मदतीने पुन्हा तिच्याशी संपर्क साधून ‘मैत्रिच्या’ संबंधाच्या हवाल्याने ‘कॅफे हाऊस’मध्ये नेले व तेथील एकांताचा फायदा घेत तिच्याशी लगड करतानाची छायाचित्रे घेतली. त्यानंतर त्याच्याच आधाराने त्याने पीडितेला ब्लॅकमेल करुन तिच्याशी पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित केले. मात्र वर्षभरानंतर पुढील शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात गेल्यानंतर तिने काही दिवसांतच सदरचे संबंध संपवण्याचे ठरवून शादाब तांबोळीच्या बळजोरीला ‘आत्महत्ये’ची धमकी देत ते संपुष्टात आणले.

मात्र ‘लव्ह जिहाद’चा किडा डोक्यात घेवून या संपूर्ण प्रकरणाचा ‘कट’ शिजवणार्या युसुफ दादा चौगुले याला ही गोष्ट मान्य नसल्याने त्याने गेल्यावर्षी 7 जुलैरोजी शादाब तांबोळीकरवी पीडितेला फोन करुन मंचर बसस्थानकावर बोलावले. यावेळी शादाब तांबोळीसोबत युसुफ चौघुलेही आपल्या वाहनासह तेथे हजर होता. त्यावेळी गाडीत बसून बोलण्याचा बहाणा करुन त्या दोघांनी तिचे अपहरण केले. या कृत्याला पीडितेने विरोध करण्यास सुरुवात केल्याने युसुफ चौघुले याने पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध केले. चाकणजवळ शादाबसह बेशुद्धावस्थेत असलेल्या पीडितेला दुसर्या वाहनातून मुंबईला नेले व तेथे आदिल शब्बीर सय्यद याच्या मदतीने त्या दोघांची सानपाड्यात मुक्कामाची आणि नंतर धर्मांतरण करुन तिच्याशी निकाह करण्याची व्यवस्थाही केली. सदरचा प्रकार उघड झाल्यानंतर तालुक्यात तणाव निर्माण झाल्याने घारगाव पोलिसांनी सूत्रधार युसुफ चौघुले याला ताब्यात घेत पीडितेसह शादाब तांबोळी याला पोलिसांसमोर शरण येण्यास भाग पाडले.

अपहरणानंतरच्या दोन दिवसांत घडलेल्या घडामोडी, लैंगिक अत्याचार, दमबाजी, धमक्या यामुळे पीडितेची प्रकृती खालावलेली असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 20 दिवसांनी ती त्यातून सावरली आणि तिने घारगाव पोलीस ठाण्यात जावून वरील संपूर्ण प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी शादाब रशीद तांबोळी (रा.घारगाव, फरार), युसुफ दादा चौघुले (वय 30, रा.घारगाव, सूत्रधार), कुणाल विठ्ठल शिरोळे (रा.घारगाव, फरार), आयाज अझीम पठाण (रा.कुरकुंडी, फरार), आदिल शब्बीर शेख (वय 36, रा.घनसोली, नवी मुंबई) आणि अमर मेहबुब पटेल (वय 29, रा.साकूर) अशा सहाजणांवर गुन्हा दाखल करीत त्याच दिवशी मध्यरात्री मुख्य सूत्रधार युसुफ चौघुले याला श्रीरामपूरातून अटक केली.

त्याच्या तपासातून अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी सुरु केली. मात्र गुन्हा दाखल होताच सर्वच आरोपी पसार झाले. दरम्यानच्या काळात दोघांचा सुगावा लागल्याने गेल्यावर्षी 4 ऑगस्टरोजी यातील आदिल शेखला मुंबईतून तर, अमर पटेल याला साकूरमधून अटक झाली. महिन्याभरात या दोघांची जामिनावर सुटकाही झाली. या दोघांना जामिन मिळाल्याने युसुफ चौगुले यानेही संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनअर्ज केला, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. मात्र तेथूनही त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्याने गेल्या फेब्रुवारीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यानच्या काळात आरोपीची बहिण हिना दादा चौघुलेने सध्या सुप्यात राहणार्या पीडितेच्या आईकडे जावून आपल्या भावाच्या जामिनअर्जाला विरोध करु नये म्हणून शिवीगाळ व दमबाजीही केली. त्याबाबतचा गुन्हाही सुपा पोलीस ठाण्यात दाखल आहे.

यासर्व गोष्टींचा विचार करुन घारगावचे तत्कालीन निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी सर्वोच्च न्यायालयात आपले लेखी म्हणणे सदर करताना सुनियोजित पद्धतीने आखलेल्या या षडयंत्राचा मुख्य सूत्रधार युसुफ चौगुलेच असल्याचे 18 मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणात मुलीला पळवून नेणार्यासह तिघे फरार असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. बचावपक्षाने आरोपी नऊ महिन्यांपासून कारागृहात असल्याचे सांगत आता त्याला डांबून ठेवण्यातून काहीच हशील होणार नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तब्बल नऊ महिन्यांपासून कारागृहात कैद असलेल्या संगमनेरातील पहिल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ युसुफ दादा चौघुले याला जामिन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली आहे.

अवघ्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस जाळ्यात ओढून शेवटी चार वर्षांनी तिचे बळजबरी अपहरण, धर्मांतरण, निकाह व अत्याचार करणारा शादाब रशीद तांबोळी, त्याला मदत करणारे पठारावरील आयाज अझीम पठाण व कुणाल विठ्ठल शिरोळे हे तिघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यातील शादाब आणि आयाज या दोघांचा पोलिसांनी कसून माग काढला होता, त्यासाठी घारगाव पोलिसांनी ओडिशापर्यंत मजल मारली. मात्र त्या उपरांतही त्यांचे हात रिकामेच राहीले. आता तांत्रिक विश्लेषणावरुन दोघेही नेपाळमध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

