आणखी एका पोलीस कर्मचार्याने संपविली आपली जीवनयात्रा! तालुक्यातील महिला पोलिसाची आत्महत्या; अवघ्या वीस दिवसांत जिल्ह्यातील तिसरी घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वर्षभरापूर्वी मुंबईहून शिर्डी पोलीस ठाण्यात बदली झालेल्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे राहणार्या 29 वर्षीय महिला पोलीस कर्मचार्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील अवघ्या वीस दिवसांच्या कालावधीत जिल्हा पोलीस दलातील तिसर्या कर्मचार्याने अशा पद्धतीने आपल्या जीवनाचा अंत केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कठोर मानसिकता लाभल्याचे समजल्या जाणार्या या विभागातील कर्मचारी एकामागून एक अशाप्रकारे टोकाचे पाऊल का उचलत आहेत यावरुनही आता जिल्ह्यात चर्चा सुरु झाल्या असून कामाच्या ताणातून की वरीष्ठांच्या जाचातून कर्मचारी असे प्रकार करीत आहेत याचा गांभीर्याने शोध घेतला जाण्याची गरज यातून प्रकर्षाने समोर आली आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी (ता.18) सायंकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी तालुक्यातील तळेगाव दिघे येथे घडली. पूर्वी मुंबई पोलीस दलात सेवेत असलेल्या लता गोरख खोकराळे या 29 वर्षीय महिला पोलीस कर्मचार्याची गेल्या वर्षी जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी शिर्डीत सेवा बजावल्यानंतर डिसेंबर 2021 पासून त्या आजारपणाच्या रजेवर गेल्या होत्या. तेव्हापासून सदरील महिला पोलीस कर्मचारी आपल्या आई-वडीलांच्या घरीच वास्तव्यास होत्या. त्यांना एक अडीच वर्षांची मुलगीही असून त्या पतीपासून विभक्त राहात होत्या.
मंगळवारी (ता.18) सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून लता खोकराळे यांनी घराच्या छताला असलेल्या लोखंडी एँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास बांधून आपली जीवनयात्रा संपविली. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांचे आई-वडील घरी परतले असता समोरचा प्रकार पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर त्यांचे नातेवाईक व आसपासच्या नागरीकांनी सदरच्या महिला पोलीस कर्मचार्यास फासावरुन खाली घेत तातडीने घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीनंतर जाहीर केले. याबाबत मयत महिलेचे वडील गोरख बाबुराव खोकराळे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हा प्रकार समजताच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या पोलीस अधिकार्यांनी आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासह मयत महिलेच्या आई-वडीलांचे सांत्त्वन करण्याचाही प्रयत्न केला. सदरील महिला पोलीस कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त रहात होत्या. त्यांना एक अडीच वर्षांची मुलगीही असून सध्या ती तिच्या आजी व आजोबांकडेच आहे. पोलीस तपासात त्या महिला पोलीस कर्मचार्यावर गेल्या काही दिवसांपासून मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरु असल्याची महत्त्वाची माहितीही समोर आली असून कदाचित त्यातूनच त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल उचलले असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या घटनेच्या मागे प्रथमदर्शनी आजारपण अथवा एकाकीपणा दिसत असला तरीही यापूर्वी अवघ्या वीस दिवसांच्या कालावधीतच जिल्ह्यात अशाच प्रकारच्या दोन दुर्दैवी घटना घडल्याचा विषयही यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आला आहे. एरव्ही कठोर मानसिकतेचा विभाग म्हणून परिचित असलेल्या पोलीस दलातील कर्मचार्यांनी जीवनातील संकटांना घाबरुन अथवा वैतागून अशाप्रकारचे पाऊल उचलावे ही गोष्ट खटकरणारी असल्याने वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी याची गांभीर्याने दखल घेवून पोलिसांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र, तणावातून मुक्त होण्यासाठीच्या शिबिरांचे नियमीतपणे आयोजन करण्याचीही गरज निमार्ण झाली आहे. सदरील आत्महत्येच्या मागे व्यक्तिगत कारण असल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले असले तरीही यामागे कामाचा ताण अथवा वरीष्ठांचा जाच आहे का याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात रुजू असलेल्या व मुळा धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या हवालदार भाऊसाहेब दगडू आघाव (वय 49) यांनी सेवेत असतानाच धरणाच्या भिंतीवर आपल्या एसएलआर रायफलमधून गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपविली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत वरीष्ठांचा जाच, खोट्या गुन्ह्यात गोवल्याने सोसावा लागलेला मानसिक व सामाजिक त्रास व आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला तणाव आदी गोष्टींचा उल्लेख करुन काही अधिकारी व कर्मचार्यांची नावेही घेतल्याने त्या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
तर, ऐन विजयादशमीच्या दिवशी (5 ऑक्टोबर) बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार सुनील धोंडीबा मोरे (वय 54) यांनीही गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या केली त्यापूर्वीपासून तीन महिने ते आजारपणाच्या रजेवर होते. मात्र रजेवर जाण्यापूर्वी त्यांचा बेलवंडीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासोबत शाब्दिक वाद झाल्याचा व त्याच कारणावरुन त्यांनी वैद्यकीय रजेचा अर्ज दिल्याचा आरोप मयत सहाय्यक फौजदाराच्या पत्नीने केला होता. त्यातूनच मानसिक तणाव वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा व त्याला सबंधित पोलीस निरीक्षकच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यावेळी केला होता. ठराविक दिवसांच्या अंतराने झालेल्या या दोन प्रकरणात आता शिर्डी पोलीस ठाण्यात सेवेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील महिला पोलीस कर्मचार्याचाही समावेश झाल्याने पोलिसांची आत्महत्या हा जिल्ह्यासाठी गंभीर विषय बनला आहे.