संतप्त नागरिकांनी ‘संग्रामनगर’चा फलक उखडून फेकला! अकोलेनाक्यावरील हल्ल्याचे पडसाद; गुन्हेगारीसह अतिक्रमणं उध्वस्त करण्याची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही वर्षात विविध गुन्हेगारी घटनांमुळे सतत चर्चेत असलेल्या अकोलेनाका परिसरात शनिवारी चौघांनी एकाला अमानुष मारहाण करीत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसरात सूर्यवंशी टोळीची दहशत अधोरेखीत झाली असतानाही पोलिसांना अद्यापही एकाचा अपवाद वगळता उर्वरीत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळता आलेल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या ढोलेवाडीतील नागरिकांनी सोमवारी रात्री म्हाळुंगी नदीजवळ आंदोलन करीत शहरातील प्रत्येक अतिक्रमण हटाओ मोहीमेत ‘मसिहा’ होवून हजर होणार्या विधिज्ञाच्या अवकृपेने चक्क म्हाळुंगी नदीत उभ्या राहीलेल्या ‘संग्रामनगर’ वसाहतीचा फलक उखडून फेकला. यावेळी आंदोलकांनी मोर्चाने शहर पोलीस ठाण्यात जावून आपल्या मागण्यांचे निवेदनही सोपवले. त्यात राजापूरकडे जाणार्या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणं भूईसपाट करण्यासह या भागातील गुन्हेगारांना गजाआड घालण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान शनिवारच्या घटनेत सहभागी असलेल्या टोळीतील आदित्य सूर्यवंशी याला जेरबंद करण्यात आले असून टोळी प्रमुखासह उर्वरीत आरोपी मात्र अद्यापही पसार आहेत.

शनिवारी (ता.19) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अकोलेनाका परिसरात बस्तान बांधलेल्या सूर्यवंशी टोळीतील चौघांनी ढोलेवाडीत राहणार्या नीलेश सोमनाथ मंडलिक या तरुणाला भररस्त्यात आडवून दगडाच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होवून तो रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच खाली कोसळला. ऐन वर्दळीच्या वेळी घडलेली ही घटना सुरु असताना वाहनचालकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र हातात दगडं घेवून सूर्यवंशी टोळीने कोणीही मध्यस्थीसाठी समोर आल्यास मुडदा पाडण्याचा दम दिल्याने त्यावेळी जमलेल्या शेकडो नागरिकांमधून कोणीही पुढे येण्यास धजावले नाही. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार सुरु असताना परिसरात मोठी गर्दी असूनही जाजू पेट्रोलपंपासमोरील बहुतेक सर्व दुकानदारांनी आपापली दुकाने वेळेपूर्वीच बंद करुन निघून जाण्याचा पर्याय निवडला. त्यावरुन सूर्यवंशी टोळीने अकोलेनाका परिसरात निर्माण केलेली दहशतही अधोरेखीत झाली.

दहशत माजवण्यासाठी करण्यात आलेल्या या मारहाणीच्या घटनेनंतर दोन दिवस उलटूनही शहर पोलिसांना त्याचे गांभीर्य समजले नाही. त्यामुळे ढोलेवाडीतील नागरिकांचा संताप अनावर होवून सोमवारी (ता.21) सायंकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या महिला, मुले, तरुण व वृद्धांनी आंदोलन करीत थेट म्हाळुंगीनदीच्या पात्रात राजरोसपणे ‘संग्रामनगर’ असा फलक लावून उभ्या राहीलेल्या गुन्हेगारी वसाहतीचा फलक उखडून फेकला. खरेतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राजापूर रस्त्याच्या रुंदीकरणावेळी या परिसरातील त्यांच्या जागेत झालेली अतिक्रमणं भूईसपाट केली होती. त्याचवेळी जलसंपदा विभागानेही थेट म्हाळुंगीच्या पात्रातच पक्की घरं बांधून नदीचे मालक बनलेल्या अतिक्रमितांना नोटीसा काढून नदीचेपात्र मोकळे करण्याची तयारी सुरु केली होती.

मात्र अशाप्रकारची कोणतीही मोहीम सुरु होताच शहराच्या, शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता केवळ ‘चमको’ भूमिकेतून चक्क गुन्हेगारांचा ‘मसिहा’ बनलेल्या एका विधिज्ञाने लागलीच कारवाईस्थळी धाव घेत न्यायालयीन धाकाचा वापर करुन जलसंपदा विभागाची बुलडोझर कारवाई रोखली. त्यामुळे खूश झालेल्या तेथील अतिक्रमितांसह परिसरात आश्रयाला असलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्यासाठी ‘मसिहा’ ठरलेल्या ‘त्या’ विधिज्ञाचे उपकार म्हणून नदीपात्रात निर्माण झालेल्या बेकायदा वसाहतीचे ‘संग्रामनगर’ असे नामकरण करीत त्याचे बारसेही साजरे केले होते. तेव्हापासून या भागातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून शहरातून चोरी होणारे बहुतेक मोबाईलही या परिसरात येवूनच ‘स्वीचऑफ’ झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

रात्रीच्यावेळी या भागातून जाणे म्हणजे स्वतःला लुटून घेण्यासारखे बनले असून महिलांच्या छेडछाड, तरुणांना विनाकारण मारहाण अशा घटना या भागाला नियमित झाल्या आहेत. त्यातून येथील बेकायदा वसाहतीत गुन्हेगारी टोळ्याही निर्माण झाल्या असून त्यांच्यातील वर्चस्व वादातून म्हाळुंगीनदी आणि अकोलेनाका परिसरात नेहमीच दोन गटात धुमश्चक्रीही सुरु असते. त्यामुळे हा परिसर रात्रीच्यावेळी सर्वसामान्यांसाठी अतिशय धोकादायक बनला आहे. शनिवारी नीलेश मंडलिक या तरुणाला झालेली मारहाणही परिसरात आपली दहशत निर्माण करण्याच्या हेतूनेच केली गेली असून त्या विरोधात आता सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी सायंकाळी संतप्त नागरिकांनी मोर्चाने येत सुरुवातीला ‘संग्रामनगर’ नावाचा फलक उखडून फेकला व त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात जावून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देत परिसरातील गुन्हेगार आणि त्यांची बेकायदा आश्रयस्थानं उध्वस्त करण्याची मागणी केली.

वास्तविक कोणत्याही प्रवाही नद्यांच्या पात्रालगतही कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई असते. संगमनेर मात्र त्याला अपवाद ठरले असून नानाविध ठिकाणांहून आलेल्या, भलतीच बोलीभाषा असलेल्या आणि रात्रीच्या अंधारात घडणार्या शहरातील विविध गुन्हेगारी घटनांमध्ये वारंवार समोर येणार्या गुन्हेगारांनी राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेचा पूर्ण लाभ घेत चक्क नदीपात्रातच मोठी मानवी वसाहत उभारली आहे. त्यातही अशा वसाहतींना ‘मसिहा’ बनून चमकोगिरी करणार्यांचे कायदेशीर अभय मिळत असल्याने दिवसोंदिवस शहराच्या बकालपणात वाढ होत आहे. प्रशासनाने नागरीहित सर्वोच्च मानून अशा गुन्हेगारी बेकायदा वसाहती तत्काळ जमीनदोस्त करुन त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

शनिवारी (ता.19) जाजू पेट्रोलपंपासमोर ढोलेवाडीतील नीलेश सोमनाथ मंडलिक या तरुणाला दगडाने बेदम मारहाण करुन पसार झालेल्या सूर्यवंशी टोळीचा म्होरक्या साई सूर्यवंशी याच्यासह अनिकेत मंडलिक व अक्षय चव्हाण अद्यापही पोलिसांपासून दूरच असून सोमवारच्या मोर्चानंतर दबावात आलेल्या पोलिसांनी रात्री उशिराने या टोळीतील आदित्य सूर्यवंशी या एकमेव आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याच्या पोलीस कोठडीतून अन्य आरोपींचा ठावठिकाणा शोधला जाणार आहे.

