भर उन्हाळ्यात अमृतवाहिनीचे पात्र खळाळते! सलग दुसरे उन्हाळी आवर्तन; पालकांनी सावध राहण्याची गरज..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांची वणवण सुरु असताना संगमनेर तालुका मात्र त्याला अपवाद ठरला आहे. भर उन्हाळ्यात गेल्या तीन आठवड्यांपासून खळाळत वाहणार्‍या अमृतवाहिनी प्रवरामाईच्या पात्रातून आता सलग दुसरे उन्हाळी आवर्तनही सुरु झाले आहे. जवळपास महिनाभर चालणार्‍या या आवर्तनातून शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आनंददायी बाब म्हणजे प्रवरेसह निळवंडेच्या दोन्ही कालव्यांनाही पाणी सोडण्यात आल्याने तालुक्याच्या बहुतेक भागात समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. सध्या तापमानाचा पाराही चाळीस अंशावर गेल्याने संगमनेरच्या घाटांवर सकाळपासूनच अबालवृद्धांची गर्दी होत आहे. वाळू तस्करांच्या मेहरबानीने गेल्याकाही वर्षात धोकादायक झालेल्या प्रवरापात्रात दरवर्षी उन्हाळी आवर्तनात दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशावेळी पालकांनी अधिक सावध राहुन जबाबदार व्यक्तिंच्या उपस्थितीशिवाय आपल्या पाल्यांना नदीपात्रापासून दूर ठेवण्याची आवश्यकता आहे. आवर्तन सोडतेवेळी दोन्ही धरणांमध्ये मिळून 8 हजार 600 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता. या आवर्तनातून साडेतीन ते चार हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होईल.


गेल्या तीन आठवड्यांपासून वाहत्या असलेल्या अमृतवाहिनीचे पात्र पुढील महिनाभर असेच खळाळत राहणार आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशानंतर जलसंपदा विभागाने रविवारी (ता.20) सकाळी 11 वाजता भंडारदरा-निळवंडे धरणातून उन्हाळी हंगामातील सलग दुसरे आवर्तन सोडले. सध्या भंडारदरा धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 850 तर, उच्चस्तरीय मोरीद्वारा 505 असा एकूण एक हजार 355 क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. उन्हाळ्यात सर्वत्र रुक्ष वातावरण असतानाही भंडारदर्‍याच्या उच्चस्तरीय दोनशे फूट उंचीवरील मोरीतून पाणी सोडण्यात येत असल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला आंब्रेला फॉल फेसाळत कोसळत आहे. त्यामुळे भरउन्हाळ्यातही पर्यटकांना पर्वणी मिळाली आहे. पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 5 हजार 922 दशलक्ष घनफूट होता.


सध्या राज्यात वीजेची मागणीही मोठी असल्याने उन्हाळी आवर्तनात भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणांतून वीजनिर्मिती सुरु आहे. भंडारदर्‍याप्रमाणेच निळवंडेच्या विद्युतगृहातून 800 तर, विमोचकातून 700 असा एकूण एक हजार 500 क्यूसेकचा विसर्ग प्रवरापात्रात सोडण्यात आला आहे. त्यासोबत धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यासह डाव्या कालव्यातून 250 व उजव्यातून 200 क्यूसेकचा प्रवाह सोडण्यात आला आला आहे. त्यामुळे निळवंडेसह भंडारदर्‍याच्या लाभक्षेत्रातून मोठे समाधान व्यक्त होत आहे. पाणी सोडताना निळवंडे धरणाचा पाणीसाठा 2 हजार 678 दशलक्ष घनफूट इतका होता. जवळजवळ महिनाभर कालव्यांसह सुरु राहणार्‍या या आवर्तनात साडेतीन ते चार हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होईल असा अंदाज आहे.


यंदा उन्हाचा पाराही चाळीशीच्या पार गेल्याने अंगाची काहीली होत आहे. अशावेळी प्रवरामाई वाहती असल्याने दरवर्षीप्रमाणे संगमनेरच्या घाटांवर सकाळपासूनच अबालवृद्धांची गर्दी होत आहे. सध्या शालेयस्तरावरील परीक्षा सुरु असल्याने लहान मुलांची संख्या कमी आहे. मात्र या आठवड्यात बहुतेक शाळांच्या परीक्षा आटोपणार असल्याने पुढील 15 दिवस नदीकाठ माणसांनी फुलून जाण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात प्रवरानदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने बहुतेक घाट आणि पात्र पोहणार्‍यांसाठी धोकादायक बनले आहे. त्यातून दरवर्षीच्या उन्हाळी आवर्तनात दुर्दैवी घटनांची श्रृंखलाही अद्याप अखंड आहे. अशावेळी पालकांनी अधिक सतर्क राहून आपल्या अथवा एखाद्या जबाबदार व्यक्तिच्या उपस्थितीशिवाय आपला पाल्य नदीपात्रात उतरणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.


खरेतर ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या संगमनेर शहरात रहिवाशांसाठी विरंगुळ्याचे कोणतेही साधन नसल्याने उन्हाळी आवर्तनाचा काळ या भागात जणू जत्राच भरत असते. संध्याकाळच्यावेळी महिला व मुलांची गर्दी वाढत असल्याने टुकार आणि विकृतांचाही वावर असतो. त्यातून यापूर्वी पात्रात आंघोळ करणार्‍या महिलांचे छायाचित्रण करणे, महिला, मुलींची छेड काढणे, प्रतिबंधित असतानाही सुसाट वेगाने दुचाकी चालवून पादचार्‍यांना धोका उत्पन्न करणे, अरेरावी, दादागिरी अशा घटनाही घडत असतात. त्यामुळे या कालावधीत पोलिसांकडूनही आवश्यक उपाय करण्याची अपेक्षा असते. यापूर्वी आवर्तनाच्या काळात पोलीस बंदोबस्त लावून अशा विकृतींना कायद्याचा धाक दाखवला गेला आहे. त्यामुळे पोलिसांनीही प्रवरेचे आवर्तन गांभीर्याने घेण्याची गरज आहे.


पोलीस बंदोबस्त आवश्यक..
उन्हाळी आवर्तनाच्या काळात संगमनेरच्या प्रवराघाटांवर सायंकाळी अबालवृद्धांची मोठी गर्दी असते. त्यात महिला, मुली व लहानमुलांची मोठी संख्या असते. अनेक कुटुंब सहपरिवार आंघोळीचा आनंद घेत असतात. उन्हाळी आवर्तनाच्या काळात या परिसराला जत्रेचे स्वरुप आलेले असते. त्यामुळे नागरिकांसह विकृतांचाही मोठा वावर असतो. यापूर्वीच्या अनुभवानुसार आंघोळ करणार्‍या महिलांचे छायाचित्रण, छेडछाड, प्रतिबंधित असूनही थेट दुचाक्या घेवून सुसाट चालवण्याचे व पादचार्‍यांचा जीव धोक्यात आणण्याचे प्रकार घडले आहेत. त्यातून जातीय तणावाच्या घटनाही समोर आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनीही उन्हाळी आवर्तन गांभीर्याने घेवून या काळात दररोज सायंकाळी प्रवराकाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची आवश्यकता आहे.

Visits: 427 Today: 3 Total: 1100145

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *