भंडारदर्‍याच्या काजवा महोत्सवावर निर्बंध? हरित न्यायाधिकरणात याचिका; संगमनेरच्या गणेश बोर्‍हाडे यांचा पुढाकार..


नायक वृत्तसेवा, अकोले
विशिष्ट कालावधीत माद्यांना आकर्षिक करण्यासाठी प्रकाशमान होणार्‍या काजव्यांनी उजळणार्‍या कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्यातील काजवा महोत्सवावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाऊस सुरु होण्यापूर्वी मे ते जून या कालावधीत आयोजित होणार्‍या या महोत्सवात पर्यटकांचा अतिरेक होत असल्याने काजव्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रात बाधा निर्माण होवून उडण्याची क्षमता नसलेल्या माद्या पर्यटकांच्या पायाखाली आणि अमर्याद वाहनांच्या टायरखाली चिरडल्या जात असल्याने काजव्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली अभयारण्यात दरवर्षी होणार्‍या या धांगडधिंग्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी भूमिका घेतली असून या भागातील पर्यटकांचा अतिरेक थोपवण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. त्यावरुन न्यायाधिकरणाने राज्याच्या वन व पर्यटन विभागाला नोटीस बजावून चार आठवड्यात शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात दरवर्षी आयोजित होणार्‍या या पर्यटन महोत्सवात काजव्यांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश द्यावेत अशा मागणीची याचिका सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी अ‍ॅड.मैत्रेय घोरपडे आणि अ‍ॅड.मानसी ठाकरे यांच्या माध्यमातून हरित न्यायाधिकरणाच्या न्या.दिनेशकुमार सिंग व तज्ज्ञ सदस्य डॉ.विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सादर केली आहे. येत्या 17 मे ते 22 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवासाठी अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश, निवास आणि तीव्र स्वरुपाच्या प्रकाश वापराबाबत कमाल मर्यादा लागू करण्याचे निर्देश देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.


पावसाळा सुरु होण्यापूर्वी नर काजवे माद्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्या शरीरातून प्रकाश निर्मिती करतात. हा सोहळा पाहण्यासाठी कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्यासह राज्यातील काही ठिकाणी काजवा महोत्सवाचे आयोजन होते. मात्र या महोत्सवादरम्यान पर्यटकांकडून प्रखर उजेडाच्या विजेरी (बॅटर्‍या), भ्रमणध्वनी, गोंगाट आणि असंख्य वाहनांच्या दिव्यांमुळे काजव्यांच्या नैसर्गिक मिलनात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे. काजवे पुनरुत्पादनासाठी जैविक प्रकाशाच्या सांकेतिक खुणांवर अवलंबून असतात. मात्र, या महोत्सवादरम्यान वाढत्या प्रकाश आणि ध्वनी प्रदूषणामुळे त्यांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होत आहे.


कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड वन्यजीव अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात (इको-सेन्सेटीव्ह) तंबू आणि इतर सुविधांसाठी वनविभागाने अनेक खासगी पर्यटन आयोजकांना परवानगी दिली आहे. हे पर्यटन निसर्ग पर्यटन बृहत आराखड्यानुसार व्हायला हवे. मात्र, राज्याच्या वन व पर्यावरण विभागासह पर्यटन खात्याने अजूनही अशी योजना तयार केलेली नाही. प्रत्यक्षात केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार ही योजना तयार करणे अनिवार्य आहे. कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अणि वनविभागाने 2024 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली. पण, काजव्यांच्या संरक्षणासाठी ती अपूर्ण होती.


महाराष्ट्रातील राधानगरी, राजमाची, पुरुषवाडी, प्रबळवाडी, भीमाशंकर आणि माळशेज घाट यासह विविध भागात काजवा महोत्सव केला जातो. मात्र, या महोत्सवातून काजव्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येतो. असंख्य पर्यटक व त्यांच्या वाहनांच्या टायरखाली उडू न शकणार्‍या माद्या चिरडल्या जातात. परिणामी त्यांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होत असल्याचेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सदर याचिकेवरुन राज्याच्या वन व पर्यटन विभागाला चार आठवड्यात शपथपत्र सादर करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 20 जून रोजी ठेवण्यात आली आहे.


गणेश बोर्‍हाडे यांची याचिका स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने वन आणि पर्यटन विभागाला नोटीस बजावली आहे. त्यात काजवा महोत्सव कोण आयोजित करतं आहे, त्यात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते किंवा कसे, अतिरीक्त मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे का, असल्यास कोणत्या तरतुदीनुसार आणि त्यासाठी सक्षम अधिकारी कोण आदी प्रश्‍न उपस्थित करुन त्यावर चार आठवड्यात न्यायाधिकरणासमोर शपथपत्र सादर करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 20 जूनरोजी ठेवण्यात आली आहे.

Visits: 416 Today: 2 Total: 1103910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *