व्यापार्‍याच्या अपहरणातील संशयिताचे रेखाचित्र जारी श्रीरामपूर शहर पोलिसांचा विविध बाजूंनी तपास सुरू

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय 52) या व्यापार्‍याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे. बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीचा काहीसा मागमूस मिळाला आहे. या संशयिताविषयी काही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी व्यापारी हिरण यांच्या शोधासाठी काही पथके तैनात केली आहेत. बेलापूर बरोबरच श्रीरामपूर शहरातही त्यांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. अपहरण केलेल्या वाहनाचे श्रीरामपूरातून काही सीसीटीव्हीतील चित्रण मिळते का? याचीही पाहणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी काही लोकांची चौकशी केल्याची माहिती आहे. व्यापारातील काही वादातून हे अपहरण घडले का? त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

दरम्यान, या घटनेवरून ग्रामस्थांमध्ये मोठ्या संतापाचे वातावरण आहे. व्यापारी हिरण यांचा तातडीने शोध घेऊन आरोपींना जेरबंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मंगळवारी गावात झालेल्या बैठकीनंतर पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे. लवकरात लवकरात आरोपींचा छडा लावला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Visits: 208 Today: 1 Total: 1792296

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *