कार्तिक स्वामींच्या उपासनेने बुद्धीची प्राप्ती ः भास्करगिरी महाराज कार्तिक पौर्णिमेनिमित्त देवगडला भाविकांची अलोट गर्दी

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील क्षेत्र देवगड येथे सलग दोन दिवस लागोपाठ आलेल्या कार्तिक तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयासह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. मंगळवारी कार्तिक पौर्णिमेला दुपारी 12 वाजता श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचा जयघोष करत महाआरती करण्यात आली. कार्तिक स्वामींच्या उपासनेने साहस, शक्ती, युक्ती व बुद्धीची प्राप्ती होते ती सर्वांना होवो, देशवासियांमध्ये एकोपा निर्माण होऊन बलशाही भारत निर्माण होवो. त्यासाठी राष्ट्रीय ऐक्य वृद्धिंगत होवो अशी प्रार्थना भास्करगिरी महाराजांनी केली.

यावर्षी सलग दोन पौर्णिमा सोमवारी (ता. 7) व मंगळवारी (ता. 8) आल्यामुळे दोन दिवसांत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी भाविकांनी दर्शनासाठी उच्चांक केला होता. यात महिला भगिनींची गर्दी लक्षणीय होती. पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते कार्तिक स्वामी व भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला. तर दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य भेंडा येथील गणेश कुलकर्णी यांनी केले.

यावेळी झालेल्या महाआरती प्रसंगी नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज पवार, बाळकृष्ण महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, गणेश महाराज दरंदले, गिरीजीनाथ महाराज जाधव, दत्ता महाराज शिंदे, देवगडचे भक्त परिवारातील संत सेवेकरी यांच्यासह औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलग दोन दिवस आलेल्या त्रिपुरारी तसेच कार्तिक पौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी त्रिपुरारी वाती जाळून विधीवत पूजन केले. घाटावर गंगास्नान करून प्रवरामाईला दिवे अर्पण केले. यावेळी देवगड घाटावरही मोठी गर्दी झाली होती. कार्तिक पौर्णिमा असल्याने भाविकांनी कार्तिक स्वामींना प्रिय असलेला मोरपीस दर्शन घेऊन अर्पण केला. पहाटेपासूनच्या गर्दीने दुपारच्या सत्रात वेग घेतला होता. मंदिराच्या प्रांगणात विविध स्टॉल लावल्याने कार्तिक पौर्णिमा उत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गंगापूर तालुक्यातील कनकोरी, गळनिंब, जामगाव येथील ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
