राहाता ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरच लसीकरण मोहिमेबद्दल अनभिज्ञ
![]()
नायक वृत्तसेवा, राहाता
येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरच कोरोना लसीकरण मोहिमेबद्दल अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठांना मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. थेट केंद्रावर कागदपत्रे सादर करुन लसीकरणाची सुविधा असतानाही, येथील डॉक्टरांना त्याबाबत काहीही सांगता येत नव्हते. व्याधी प्रमाणपत्राचे निकष कुणालाही ठावूक नव्हते. त्यामुळे काहींना गरज नसताना प्रमाणपत्र मिळवणेसाठी हेलपाटे मारावे लागले. लसीकरण झालेल्यांची संख्या कमी आणि दमछाक झालेल्यांची संख्या अधिक असे चित्र पहिल्या दिवशी पहायला मिळाले. त्यामुळे आता तरी हा गोंधळ दूर करावा, अशी मागणी ज्येष्ठांनी केली आहे.

राहाता ग्रामीण रुग्णालयात काल दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते. ऑनलाइन नोंदणीसाठी ज्येष्ठांसह व्याधिग्रस्तांची दमछाक सुरू होती. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी वय वर्षे 60 असावे की 65 याबाबत कोणालाच माहिती नव्हती. 60 वर्षे वयाच्या नागरिकांनीही व्याधिग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र आणावे, असे बिनदिक्कत सांगण्यात आले. त्यामुळे केंद्रातून हात हलवत परत जाण्याची वेळ ज्येष्ठांवर आली. काहींनी धावपळ करून डॉक्टरांकडूनही प्रमाणपत्रे मिळविली. घाईने पुन्हा ही मंडळी ग्रामीण रुग्णालयात आली. मात्र, तोपर्यंत अधिकारी व डॉक्टरांचा गैरसमज दूर झाला होता. त्यांनी दुपारनंतर 60 वर्षांवरील नागरिकांना, व्याधी असल्याची प्रमाणपत्रे न घेता लस द्यायला सुरुवात केली. एकीकडे वृत्तवाहिन्यांवरून ऑनलाइन नोंदणीत अडचणी आल्यास थेट केंद्रावर कागदपत्रे दाखवून लसीकरण केले जाईल, अशी माहिती दिली जात होती. मात्र येथील अधिकारी, डॉक्टरांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नव्हती. वरिष्ठांनी त्यांना पुरेशी माहिती न दिल्याने त्यांनाही काय सांगावे, हे सूचत नव्हते. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के म्हणाले, की संकेतस्थळ बंद पडत असल्याने ऑनलाइन नोंदणीत अडचणी येत होत्या. तथापि, तरीही नागरिकांनी नोंदणी केली. या गोंधळाबाबत माहिती घेऊ.
