पोलीस बंदोबस्ताशिवाय जायकवाडीला पाणी नाही? जलसंपदाला आरक्षण आंदोलनाचा धसका; मराठवाड्याविरोधात संघर्षाचीही भीती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
१५ ऑक्टोबर रोजी गोदावरी उर्ध्व भागातील धरणांमधील पाणी पातळीनुसार जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा धरणातून त्यातील ५.४६ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्या दृष्टीने जलसंपदा विभागाने तयारीही पूर्ण केली आहे. मात्र सध्या मराठवाड्यात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समोर येत असतानाच नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह राजकीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याचा धसका घेवून अहमदनगर जलसंपदाने पोलीस बंदोबस्त प्राप्त झाल्याशिवाय पाणी सोडण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्याशिवाय पाणी सोडल्यास त्याला मोठा विरोध होवून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा नवा संघर्ष उभा राहण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आज-उद्यात पाणी सोडण्याचे गोदावरी विकास महामंडळाचे आदेश पुढील काही दिवस बारगळण्याची शक्यता आहे.

समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रानुसार दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडीसह गोदावरी उर्ध्व भागातील सर्व धरणांमधील पाणीपातळी मोजली जाते. त्यावेळी जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास वरच्या भागातील धरणांमधून पाणी सोडून राहिलेली तूट भरुन काढावी लागते. यावर्षी नाशिक व नगर जिल्ह्यातील गोदावरी खोर्‍यातील धरणं गतवर्षीच्या शिल्लक साठ्यावर रडतखडत भरली, मात्र दोन्ही जिल्ह्यातील लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने सध्या दुष्काळसदृश स्थिती आहे. तर, जायकवाडी धरणात नाशिक व नगर जिल्ह्यातून एकूण २०.४३३ टीएमसी पाणी जमा होवून ३१ ऑक्टोबर अखेर या महाकाय धरणातील एकूण पाणीसाठा ६१.१८६५ टीएमसी (५९.५६ टक्के) व उपयुक्त पाणीसाठा ३५.१२०२ टीएमसी (४५.८१ टक्के) इतका होता. समन्यायी पाणीवाटपानुसार ऑक्टोबर अखेर जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा ६५ टक्के म्हणजेच ४९.८४ टीएमसी असणे आवश्यक आहे.

 

१५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडीतून खरीपासाठी एकूण ७.७४९० टीएमसी पाण्याचा तर ३१ ऑक्टोबर अखेर एकूण ८.८०९५ टीएमसी इतका पाण्याचा वापर करण्यात आला. या सर्वांची गोळाबेरीज करुन गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सं. रा. तिरमनवार यांनी ३१ ऑक्टोबर रोजी आदेश काढून वरच्या भागातील भंडारदरा व गंगापूर, दारणा धरण समूहातून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भंडारदरा-निळवंडे-आढळा-भोजापूर धरण समूहातून ३.३६ टीएमसी, मुळा व मांडओहोळ धरणातून २.१० टीएमसी असे एकूण ५.४६० टीएमसी. तर, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, कश्यपी व गौतमी धरण समूहातून ०.५ टीएमसी व दारणा, कडवा, आळंदी, भाम, वाकी, मुकणे व वालदेवी धरण समूहातून २.६४३ टीएमसी असे एकूण ३.१४३ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.

मराठवाडा सिंचन महामंडळाने ३१ ऑक्टोबर रोजीच्या आदेशात दोन दिवसांत पाणी सोडण्याची तजबीज करण्याचे आदेश दिल्याने अहमदनगर जलसंपदा विभागाने त्याची तयारीही पूर्ण केली होती. मात्र सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनास मराठवाड्यासह काही भागात हिंसक वळण लागले आहे. नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही या आंदोलनाची धग पोहोचली आहे. त्यातच जायकवाडीतील पाण्याचा मनमानी वापर आणि जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थिती यामुळे यंदा शेतकर्‍यांसह राजकीय पुढार्‍यांनीही मुळा, भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला आहे. त्या कारणाने जलसंपदाने पोलीस बंदोबस्ताशिवाय पाणी सोडल्यास मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिक असा नवा संघर्ष उभा राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करताना पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच पाणी सोडण्याची भूमिका घेतल्याने ‘दोन’ दिवसांत पाणी सोडण्याचे आदेश बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ काय भूमिका घेते याकडे नगर व नाशिकमधील शेतकर्‍यांचे लक्ष खिळले आहे.

Visits: 109 Today: 1 Total: 1100509

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *