माजी मंत्री मधुकर पिचडांनी सपत्नीक घेतली कोरोना लस

नायक वृत्तसेवा, अकोले
सरकारने साठ वर्षांवरील वृद्धांसह 45 ते 59 वयोगटातील गंभीर आजार असणार्या व्यक्तींना 1 मार्चपासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार माजी मंत्री मधुकर पिचड यांनी बुधवारी (ता.3) सकाळी 10 वाजेच्या सुमारास अकोले ग्रामीण रुग्णालयात सपत्नीक येऊन लस टोचून घेतली.

यावेळी त्यांच्यासोबत अकोले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे.डी.आंबरे, सचिव यशवंत आभाळे, खजिनदार एस.पी.देशमुख, गिरजाजी जाधव, सुधाकर देशमुख, राजेंद्र डावरे, प्राचार्य भास्कर शेळके, प्रा.संजय पगारे, प्रा.ताकटे व एस.पी.मालुंजकर आदी होते. आकाश दसरे यांनी लसीकरण केले. आरोग्याधिकारी डॉ.बाळासाहेब मेहेत्रे, डॉ.सुनील साळुंके, डॉ.सुरेखा करवंदे (पोपेरे) आदी उपस्थित होते. लसीकरणानंतर बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले, मी दोन महिन्यांपूर्वी आजारी असल्याने मुंबईत उपचार घेत होतो. कोरोना प्रतिबंधक लसही मुंबईत माझ्यावर उपचार करणार्या दवाखान्यात घेता आली असती. परंतु अकोल्यात लस घेतली तर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसह इतरांची लसी संदर्भातील भीती दूर होईल; म्हणून जाणीवपूर्वक अकोल्यात लस घेतली. दरम्यान, पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. आता ज्येष्ठ नागरिकांसह कोविड योद्ध्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु कोविड प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने लसीकरण करता येत नाही. ऑफलाईन सुविधा नसल्याने नोंदणी होईपर्यंत लसीकरण करता होत नाही.

अकोले तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी 11 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात खासगी प्रयोगशाळेतून म्हाळादेवी येथील 68 वर्षीय पुरूष, शहरातील 35 वर्षीय पुरूष, कोतूळ येथील 39 वर्षीय पुरूष व राजूर (सावरकुटे) येथील 65 वर्षीय पुरूष या चार व्यक्तींचा समावेश आहे. तर शासकीय प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार शहरातील 53 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरूण, 70 वर्षीय महिला, शेकईवाडी येथील 25 वर्षीय तरूण, नवलेवाडी येथील 17 वर्षीय मुलगा व कोतूळ येथील 20 वर्षीय तरूण यांचा समावेश आहे.
