शेवगावमधील ममता मंगल कार्यालयावर तहसीलदारांची कारवाई वधू-वरांच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा; तर मंगल कार्यालय ‘सील’

नायक वृत्तसेवा, शेवगाव
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून त्यामागे गर्दी जमवून केले जाणारे विवाह समारंभ हे एक कारण असल्याचे पुढे आले आहे. तरीही लोक यातून बोध घेत नाहीत. शेवगावमध्ये गुरुवारी (ता.2) दुपारी असाच एक मोठा विवाह समारंभ झाला. सुमारे पाचशे वर्हाडींच्या उपस्थितीत लागलेल्या या लग्नात जेवणावळी सुरू असतानाच प्रशासन पोहचलं आणि कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून मंगल कार्यालय सील करण्यात आले आहे.

शेवगाव येथील मिरी रस्त्यावरील ममता मंगल कार्यालय येथे नियम मोडून विवाह सुरू असल्याची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता लग्न विधी पूर्ण होऊन जेवणावळी सुरू होत्या. त्यांनी त्याचे चित्रीकरण सुरू केले. सुरुवातीला याकडे कोणीही लक्ष दिले नाही. बहुतेकजण जेवणावळीत दंग होते. त्यानंतर तहसीलदारांनी चौकशी सुरू केली आणि कारवाईला सुरुवात केली. कारवाई होत असल्याचे लक्षात आल्यावर वर्हाडींची एकच धावपळ सुरू झाली. संयोजक कोण आहे, कोणीच सांगायला तयार होईना. आम्ही पाहुणे म्हणून आलो आहोत, असे प्रत्येकजण सांगू लागला. तहसीलदारांनी मग पोलिसांना बोलावून घेतले. त्यांनी वधू-वरांकडे चौकशी केली. त्यानंतर वर आणि वधू पिता समोर आले.

वधू तालुक्यातील वडुले या गावातील तर वर पैठण तालुक्यातील आहे. लग्न समारंभासाठी केवळ 50 व्यक्तींना परवानगी आहे. मात्र येथे प्रत्यक्षात पाचशेहून अधिक वर्हाडी जमले होते. मास्क, सुरक्षित अंतर, कोरोना सुसंगत वर्तन या नियमांचाही भंग केला जात होता. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या संयोजकांवर म्हणजे वधू-वरांच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गर्दी होऊ न देण्याची आणि दिलेल्या परवानगीतील अटींचे पालन करण्याची जबाबदारी मंगल कार्यलयांचीही आहे. त्यामुळे कार्यालय मालकाला दंड करण्यात आला. याशिवाय कोरोना परिस्थिती पूर्ण संपेपर्यंत हे मंगल कार्यालय सील करण्यात आल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
