भाजपमधील व्यक्तिगत वाद चव्हाट्यावर! आता दुसऱ्या गटाचीही तक्रार; विधानसभेचा विजय पचवता येईना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच भाजपमधील अंतर्गत खदखद आता बाहेर निघू लागली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच एका जिल्हा पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आता दुसऱ्या गटाकडूनही त्या विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनाक्रमातून भाजपमधील व्यक्तिगत वाद चव्हाट्यावर आल्याचेही दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पक्षांतर्गत एकमेकांवर शिंतोडे उडवण्याच्या या प्रकाराने महायुतीला संगमनेरात मिळालेले यश पचवता येत नसल्याचीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहाण गुरुवारी (ता.2) नाशिककडे जाताना संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मंत्री चौहाण नाशिककडे रवाना झाल्यानंतर काही वेळातच मागील व्यक्तिगत वादातून सुयोग गुंजाळ व राहुल भोईर या दोघांनी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यावरुन त्यांनी शनिवारी (ता.४) दुपारी दिलेल्या तक्रारीवरुन वरील दोघांवर मारहाण शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

या घटनेला 24 तासांचा कालावधी उलटण्यापूर्वीच आता भाजपचे शहर सरचिटणीस राहुल भोईर व सुयोग गुंजाळ या दोघांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यात गुरुवारच्या केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहाण यांच्या कार्यक्रमाचा उल्लेख करीत मागील वादाच्या कारणावरुन ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत व भाजपचे तालुका उपाध्यक्ष साहेबराव वलवे या दोघांनी भोईर व गुंजाळ यांना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. हा प्रकार घडला त्यावेळी शिवीगाळ करणारे दोन्हीही पदाधिकारी मद्याच्या नशेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने संगमनेर शहर भाजपमधील व्यक्तिगत वादांनी चव्हाटा गाठल्याचे दिसत असून महायुतीने संगमनेरात मिळविलेले ऐतिहासिक यशही त्यांना पचवता येत नसल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.

Visits: 403 Today: 1 Total: 1420368
