शेतकरी पुत्राची कमाल; सोयाबीन जैवइंधनावर संशोधन प्रा. आर. एस. गव्हाणेंना सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पीएच. डी.

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक आर. एस. गव्हाणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. नुकतीच मिळाली आहे. इफेक्ट ऑफ नॅनो ऍडिटिव्ह्स ऑन परफॉर्मन्स अँड एमिशन कॅरॅक्टरस्टिकस ऑफ बायोडिझेल फ्युल्ड व्हीसीआर इंजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ इमिशन मॉडेल्स हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. डॉ. अजित काटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गव्हाणे यांनी हे घवघवीत यश मिळविले आहे.

संगमनेरमधील तळेगाव सारख्या ग्रामीण आणि दुष्काळी भागातून आपल्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात त्यांनी केली. स्व. सोपान शिवराम गव्हाणे यांचे ते सुपुत्र आहेत. अभियांत्रिकीचे उत्कृष्ट शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील मुलांना शिकवायचे हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. 18 वर्षे प्राध्यापकपदाची धुरा सांभाळत असताना संशोधनावर त्यांनी अधिक भर दिला.

पारंपरिक ऊर्जास्रोत आणि इंधन याची कमतरता संपूर्ण जगाला भेडसावत असून प्रदूषणाचे प्रमाणही वाढतच आहे. अशातच जैवइंधनाच्या पर्यायांचा अभ्यास करत असताना प्रा. गव्हाणे यांना सोयाबीन पिकातून होणार्या इंधनाची निर्मिती आणि त्यावर चालणार्या इंजिनची कल्पना सूचली. शेतकरी सोयाबीनचे उत्पादन प्रचंड प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे त्यापासून तयार होणार्या इंधनाच्या उप्लब्धतेबाबत साशंकता येणार नाही हा विचार प्रा. गव्हाणे यांनी केला. व्हेरिएबल कॉम्प्रेशन रेशो हे इंजिन वापरून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. सोयाबीन जैवइंधनाचे वेगवेगळ्या ब्लेन्डसची चाचणी करून मिळणारे परिणाम खूप आशादायी असल्याचे प्रा. गव्हाणे म्हणाले.

या संशोधनावर आधारित पाच सायन्स पेपर्स जागतिक पातळीवरील जर्नल्समध्ये त्यांनी प्रकाशित केले आहेत. एका आंतरराष्ट्रीय आणि एका राष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये त्यांनी आपले प्रबंध सादर केले होते. यातील दोन संशोधन प्रबंधांसाठी त्यांना बेस्ट पेपर अवॉर्डही मिळालेले आहेत. पारंपरिक इंधनास उत्कृष्ट पर्याय आणि प्रदूषण करणे कामी हे संशोधन मैलाचा दगड ठरणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख, दुर्गा तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डीन डॉ. एम. आर. वाकचौरे, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, विभागप्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे यांनी अभिनंदन केले आहे.
