नवीन पोलीस निरीक्षक अवैध व्यवसायांकडे लक्ष देतील का? ः अॅड.पोळ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासाठी तीन महिन्यातच नवीन पोलीस निरीक्षक बदलून आले. मात्र नवीन पोलीस निरीक्षक अवैध व्यवसायांकडे लक्ष देतील का? अशी माफक अपेक्षा लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.नितीन पोळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

शहरात शहरात जुगार, मटका, ऑनलाईन लॉटरी आदी अवैध धंदे पोलीस अधिकारी व राजकीय पुढार्यांच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहेत. मात्र याकडे पोलीस अधिकारी अर्थपूर्ण संबंधातून दुर्लक्ष करतात. अनेकदा याबाबत नागरिकही आवाज उठवतात. तरी देखील पोलीस याकडे दुर्लक्ष करतात. यापूर्वी हे अवैध धंदे बंद करण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी धरणे आंदोलनही करण्यात आले. मात्र पोलिसांनी याकडे कानाडोळा केला. तसेच शिर्डी येथील अवैध व्यवसाय बंद व्हावे म्हणून केलेल्या उपोषणास पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन विशेष पथक स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. अद्यापही या पथकाने कारवाईची चुणूक दाखवली नाही. या पार्श्वभूमीवर किमान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतलेल्या नूतन पोलीस निरीक्षकांनी तरी अवैध धंद्यांचा नायनाट करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेच्यावतीने लोकस्वराज्य आंदोलनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
