पठारभागातील खासगी सावकारांवर ‘पाश’ आवळला! तिघांवर गुन्हा दाखल; वसुलीच्या बदल्यात मालमत्ता गिळण्याचा सपाटा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात खासगी सावकारी विरोधात कायदा असतानाही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अभावाने आजही शहरासह ग्रामीणभागात खासगी सावकारीच्या पाशात हजारों गळे अडकत आहेत. अव्वाच्या सव्वा व्याजदराने सुरु असलेली ही लुट थांबतच नसल्याने यापूर्वी अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत. पठारभागातील सावकाराच्या पाशात अडकलेल्या एका दाम्पत्यावरही अशीच वेळ आली होती, मात्र संगमनेरचे सहकार खाते त्यांच्या मदतीला धावल्याने साकूरमधील तिघा खासगी सावकारांनाच आता कायद्याचा फास बसला आहे. सचिन बन्सी डोंगरे, बन्सी पंढरीनाथ डोंगरे आणि राहुल किसन डोंगरे अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. सहकार उपनिबंधकांच्या पथकाने या तिघांच्या घरावर घातलेल्या छाप्यात मोठे घबाड हाती लागले असून या त्रीमूर्तीने पठारावरील अनेकांचे गळे चिरुन त्यांच्या मालमत्ता गिळल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.
याबाबत संगमनेरचे सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जनरल स्टोअर्सचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालवणार्या साकूरमधील एका दाम्पत्याने सचिन बन्सी डोंगरे, बन्सी पंढरीनाथ डोंगरे आणि राहुल किसन डोंगरे या तिघा खासगी सावकारांच्या विरोधात सहकार उपनिबंधकांकडे तक्रार नोंदवली होती. या दाम्पत्याने आपला व्यवसाय, घरबांधणी व मुलाच्या लग्नासाठी साकूरमधील मिळकतीसह ग्रामपंचायत क्षेत्रात असलेली मिळकत गहाण ठेवून सचिन डोंगरे याच्याकडून शेकडा पाच आणि चाळीस टक्के व्याजदराने, तर, राहुल डोंगरे याच्याकडून शेकडा 20 टक्के व्याजाने कर्ज घेतल्याचे तक्रारदाराने लेखी सांगितले होते.
त्यानुसार तक्रारदाराने सचिन बन्सी डोंगरे याच्याकडून 10 लाख रुपये व राहुल किसन डोंगरे याच्याकडून 5 लाख 20 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते व त्या बदल्यात सचिन डोंगरे याला 9 लाख 72 हजार तर, राहुल डोंगरे याला 32 लाख 72 हजार 570 रुपयांचा परतावा केला होता. प्राप्त तक्रारीवरुन सहकार उपनिबंधकांच्या पथकाने सावकारी अधिनियमाच्या कलम 16 अन्वये तिघाही सावकारांच्या घरावर छापा घातला. या छाप्यात तक्रारदाराने सचिन डोंगरे याच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या विवरणासह त्यांच्याकडून 5 लाख 20 हजारांसह प्रत्येकी दोन लाखांची रक्कम टाकून घेतलेले धनादेश, 5 जानेवारी 2018 रोजी दत्तात्रय जोधळे यांच्यासोबत केलेली विसार पावती, 6 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांच्या मिळकत गिळण्यासाठी झालेले खरेदीखत, 11 नोव्हेंबर रोजी रामभाऊ वनवे यांच्याकडून लिहून घेतलेले मुदत गहाणखत, या शिवाय अन्य लोकांकडून लिहून घेतलेल्या विसार पावत्या, गहाणखत, खरेदीखत, धनादेश, नोंदवही व त्यातील नोंदी असे मोठे घबाड तपास पथकाच्या हाती लागले.
या तपासातून सचिन बन्सी डोंगरे याने तक्रारदाराच्या मुलाच्या नावावर 5 लाख 24 हजार 500, त्याच्या पत्नीच्या नावावर एक लाख व 3 ऑगस्ट रोजी हात उसने चार लाख अशी एकूण 10 लाख 24 हजार 500 रुपयांची रक्कम दिल्याचे दिसले. तर त्याबदल्यात मुलाच्या खात्यातून 3 लाख 20 हजार 100 रुपये व तक्रारदाराच्या पत्नीच्या खात्यातून 37 हजार रुपये असे एकूण 3 लाख 57 हजारांची परतफेड झाल्याचेही आढळले. या व्यवहारावरुन सावकार सचिन डोंगरे याला तक्रारदाराकडून 19 लाख 79 हजार 97 रुपये तर बन्सी डोंगरे याला 6 लाख 67 हजार चारशे रुपये घेणे असल्याच्या नोंदीही आढळल्या.
तर, या प्रकरणातील तिसरा सावकार राहुल किसन डोंगरे याने तक्रारदाराला वेळोवेळी 53 लाख 12 हजार 207 रुपये दिल्याचे व त्याबदल्यात त्यांच्याकडून 33 लाख 33 हजार 110 रुपये परतावा घेतल्याचेही दिसून आले आहे. तक्रारदराने ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे स्क्रिनशॉट जोडलेले आहेत. त्यानुसार राहुल डोंगरे याने तक्रारदराला दोनवेळा मिळून 40 लाख 73 हजार 27 रुपये दिल्याचे व त्या बदल्यात त्याला 21 लाख 97 हजार 240 व सचिन डोंगरे यास 1 लाख 84 हजार 300 रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसते. या छाप्यात आवश्यक असलेले पुरावे हाती लागल्यानंतर सहकार अधिकार्यांनी घारगाव पोलिसांकडे महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलम 39 अन्वये घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.
खासगी सावकारांच्या पाशात अडकलेल्या शेतकर्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्यानंतर 2006 साली राज्यात खासगी सावकारी विरोधात आगडोंब उसळला. त्यातून सावकारी विरोधात कायदाही करण्यात आला. सुरुवातीला या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाल्याने राज्यातील खासगी सावकारी नियंत्रणात आली होती. मात्र गेल्या काही वर्षात सामान्यांच्या गळ्या भोवती खासगी सावकारांचा पाश पुन्हा आवळला जावू लागला असून शहरासह तालुक्यात सावकारांचर सुळसुळाट झाला आहे. त्यातही डोंगरे सारखे सावकार कर्जदाराच्या मालमत्ताच गिळीत असल्याने सहकार खात्याने या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.