सावधान! कोविडची दुसरी लाट आपली प्रतीक्षा करीत आहे!! कोविडबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णगती पोहोचली आठवरुन थेट सोळावर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडवरील लस घेवून उगवलेल्या नववर्षाच्या पहिल्या महिन्यात जवळपास माघार घेत अवघ्या 7.77 या सरासरीवर पोहोचलेला कोविडचा प्रादुर्भाव दुसर्याच महिन्यात दुप्पट झाला आहे. शासकीय कर्मचार्यांच्या लसीकरणाला झालेली सुरुवात, त्यातून निर्माण झालेला निष्काळजीपणा आणि राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे रुग्णवाढीला गती मिळाल्याचे बोलले जात असूनही नियमांचे पालन करण्यातील हलगर्जीपणा कायम असल्याने गेल्या पाच दिवसांतील रुग्णवाढीचा सरासरी वेग 15.60 रुग्ण दररोज झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोविड बाधितांची संख्या आता 6 हजार 557 वर पोहोचली असून त्यातील 83 रुग्ण सक्रीय आहेत.

गेल्या वर्षाच्या शेवटच्या सत्रात डिसेंबरमध्ये सरासरी 26.32 या वेगाने 816 रुग्णांची भर पडली होती. याच महिन्यात पुणे येथील सिरम इन्सिटट्युटची कोव्हिशिल्ड आणि हैद्राबादची कोव्हॅक्सिन नववर्षात उपलब्ध होणार असल्याची घोषणा झाल्याने देशभरात चैतन्य निर्माण झाले. शासनाने लसीकरणाबाबतचे नियम जाहीर करतांना 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवातही केली. सुरुवातीच्या टप्प्यात कोविड योद्ध्यांनाच लस देण्याची घोषणा झाली, त्यामुळे सामान्यांना या वर्षाच्या मध्यानंतरच लस उपलब्ध होईल असे संकेत मिळाल्याने व कोविडचा प्रभाव अद्यापही असल्याने शासन व प्रशासनाकडून कोविड नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार नागरिकांना आवाहन केले गेले.

नववर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याचा परिणामही दिसून आला. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसांत तालुक्यातील कोविड बाधितांची संख्या निम्म्यावर आला व सरासरीही 12.6 इतकी खालावली. त्यानंतरच्या दहा दिवसांत त्यात आणखी घट होवून सरासरी 7.3 या गतीवर आली तर महिन्याच्या शेवटच्या अकरा दिवसांत त्यात आणखी मोठी घसरण होवून रुग्णगतीवर जवळपास नियंत्रण मिळविल्याप्रमाणे स्थिती निर्माण होवून या अकरा दिवसांत सरासरी 3.82 वेगाने अवघ्या 42 रुग्णांची भर पडली. या संपूर्ण महिन्यात सरासरी दररोज 7.77 या गतीने तालुक्याच्या एकूण संख्येत 241 नवीन रुग्णांची वाढ झाली. डिसेंबरच्या तुलनेत या महिन्यात समोर आलेल्या एकूण रुग्णांची संख्या खूप कमी होती.

याच दरम्यान जानेवारीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांसह अहमदनगर जिल्ह्यातही ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींमध्येही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने व या निवडणुका पार पडल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणूकांतर्गत जिल्हा सहकारी बँकेचीही निवडणूक पार पडल्याने नागरिकांचे कोविडच्या प्रादुर्भावाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. त्याचा दुष्परिणाम फेब्रुवारीच्या अगदी सुरुवातीपासूनच समोर यायला सुरवात झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या सात दिवसांमध्ये तालुक्याच्या सरासरीत तब्बल चारची भर पडून 84 रुग्ण समोर आले. त्यानंतरच्या सात दिवसांत त्यात किंचित घट होवून 10.57 च्या सरासरीने 74 रुग्ण तर त्यानंतर आजवरच्या आठ दिवसांत 10.91 सरासरीने 82 रुग्णांची भर पडली.

जानेवारी महिन्यात पूर्णतः नियंत्रणात आलेल्या कोविडच्या प्रादुर्भावात चालू महिन्या महिन्यात भर पडल्याचे आणि सरासरी वाढतच असल्याचेही समोर आले. निवडणूकांचे दुष्परिणाम म्हणूनच की काय जानेवारीत 7.77 सरासरी असलेल्या संगमनेर तालुक्यात फेब्रुवारीत मात्र 10.91 या गतीने आत्तापर्यंत तब्बल 240 रुग्णांची भर पडली आहे. त्यातील गेल्या पाच दिवसांपासून राज्यभरातील कोविड बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून संगमनेर तालुक्याच्या सरासरीतही वाढ होत गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी 15.6 रुग्ण या गतीने तब्बल 78 रुग्णांची भर पडल्याने तालुका आता 6 हजार 557 रुग्णसंख्येवचर पोहोचला आहे. या महिन्यात पारंगाव बु. व कासारा दुमाला येथील सत्तरवर्षीय दोन महिलांचा मृत्यूही झाल्याने तालुक्यातील एकूण कोविड मृतांची संख्याही आता 52 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता 74 हजार 638 झाली आहे. त्यातील 882 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. ठिकठिकाणच्या स्थानिक आरोग्य यंत्रणा व खासगी रुग्णालयांद्वारे आत्तापर्यंत 4 लाख 1 हजार 63 जणांची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यातून रुग्ण समोर येण्याचा आजचा दर 18.61 आहे. जिल्ह्यातील 72 हजार 632 नागरिकांनी उपचार पूर्ण केले असून दुर्दैवाने 1 हजार 124 जणांचे कोविडने बळी घेतले आहेत.

