मंगल कार्यालयांवर कारवाईचा अधिकार आता पोलिसांनाही! कर्मचार्यांसह पन्नासपेक्षा जास्त उपस्थिती ठरणार दहा हजारांच्या दंडास पात्र

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशात कोविडची दुसरी लाट सुरु झाल्याचे बोलले जात असून त्याचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यातील कोविड रुग्णवाढीला पुन्हा गती प्राप्त झाली असून राज्य शासनाने नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना पूर्णतः मनाई करण्यात आली असून अंत्यविधी व लग्न सोहळ्यांच्या उपस्थितीवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईसाठी आता पोलिसांनाही अधिकार प्रदान करण्यात आले असून नियमांपेक्षा अधिक गर्दी व कोविड नियमांकडे दुर्लक्ष करणार्यांना दहा हजारांपर्यंत दंड केला जाणार आहे.

गेल्या चालू महिन्यात जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत एकसारखी वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात सरासरी 109 रुग्ण दररोज या गतीने दररोज कोविड बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. डिसेंबरमध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सिन या दोन लस लसीकरणासाठी उपलब्ध होत असल्याची घोषणा होवून 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये कोविडबाबत दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षणही यानिमित्ताने समोर आले आहे. त्यातच राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांसह जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणूकाही पार पडल्याने आणि निवडणूकांमध्ये नागरिकांना कोविडचा विसर पडल्याने आटोक्यात आलेली कोविडची स्थिती बिघडल्याचे बोलले जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात नव्याने काही निर्बंध लागू आहेत. त्यानुसार 15 मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले असून पाचापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासोबतच रात्री 10 ते पहाटे 5 यावेळेत अत्यावश्यक कारण वगळता सामान्य नागरिकांच्या हालचालींवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत. जमावबंदी आदेश लागू झाल्याने अंत्यविधी व पूर्वनियोजित विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीबाबत नियम लागू करण्यात आले असून अत्यंविधीसाठी 20 आणि विवाह सोहळ्यासाठी दोन्ही बाजूची पाहुणे मंडळी व संबंधित ठिकाणचे कर्मचारी मिळून पन्नास पेक्षा अधिक लोकांना उपस्थित रहाता येणार नाही.

याबाबत सर्व मंगल कार्यालये, लॉन्स व सभागृह चालकांना सूचित करण्यात आले असून वरीलप्रमाणे उपस्थितीबाबत त्यांना कळविण्यात आले आहे. त्याबरोबरच अशा ठिकाणी उपस्थित राहणार्या प्रत्येकाने मुखपट्टीचा वापर करण्याचे बंधन आहे. कार्यालयात सामाजिक अंतराचे मापदंड आणि परिसराचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्याबाबत आणि येणार्या सर्व पाहुण्यांसाठी सॅनिटायझरची उपलब्धता करण्याबाबतही कळविण्यात आले आहे. विवाह सोहळे आयोजित होणार्या ठिकाणांची अचानक तपासणी करुन नियमांचे उल्लंघन होत असल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी आता पोलीस दलातील पोलीस नाईकपदाच्या कर्मचार्यापासून ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांना थेट दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे धूमधडाक्यात लग्न उरकण्याची योजना आखणार्यांनी या नवीन नियमांचे स्मरण ठेवून कोविडची दुसरी लाट येण्यापूर्वीच थोपविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

गेल्या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव ऐन भरात असताना शहरातील काही पांढरपेशांनी नियमांची एैशीतैशी करीत आपल्या मुला-मुलींचे लग्न सोहळे धूमधडाक्यात साजरे केले. त्याचा परिणाम शहर व तालुक्यातील कोविडचा संसर्ग वाढण्यात झाला तर काहींचा बळीही गेला. असे असतांनाही नागरिक अद्यापही कोविडचे गांभीर्य पाळीत नसल्याने प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईबाबतचा आदेश नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असल्याने नागरिकांनी या आदेशाला निर्बंध न समजता त्याचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

